नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढल्याचे दिसून आले आहे. गेल्या २४ तासांत १ लाख ३२ हजार ७८८ नव्या कोरोनाबाधितांची भर पडली असून ३,२०७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात २,३१,४५६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत १ लाख ३२ हजार ७८८ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ३२०७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात २ लाख ३१ हजार ४५६ रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. याआधी सोमवारी १ लाख २७ हजार ५१० कोरोनाबाधितांची नोंद झाली होती तर २७९५ रुग्णांचा मृत्यू झाला होता. सलग विसाव्या दिवशी नव्या कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे.
देशातील पाच राज्यांपैकी तमिळनाडूमध्ये सर्वात जास्त रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या २४ तासांत तमिळनाडूमध्ये २६,५१३, केरळमध्ये १९,७६०, कर्नाटकमध्ये १४,३०४, महाराष्ट्रात १४,१२३ तर आंध्र प्रदेशात ११,३०३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
देशभरात आतापर्यंत २ कोटी ८३ लाख ७ हजार ८३२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. २ कोटी ६१ लाख ७९ हजार ८५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर देशात आतापर्यंत ३ लाख ३५ हजार १०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात १७ लाख ९३ हजार ६४५ सक्रिय रुग्ण आहेत. तर २१ कोटी ८५ लाख ४६ हजार ६६७ जणांनी कोरोनावरील लस घेतली आहे.
राज्यातली स्थिती
मंगळवारी दिवसभरात राज्यात १४ हजार १२३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. मात्र, त्याचवेळी राज्यात ३५ हजार ९४९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा ५४ लाख ३१ हजार ३१९ इतका झाला असून रिकव्हरी रेट थेट ९४.२८ टक्क्यांवर गेला आहे.