नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत २ हजारांनी घट झाली आहे. गेल्या २४ तासांत २५ हजार ४०४ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर ३३९ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये देशात २५ हजार ४०४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे आता उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या तीन लाख ६२ हजार २०७ झाली आहे. तर काल दिवसभरात ३७ हजार १२७ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता तीन कोटी २४ लाख ८४ हजार १५९ वर पोहोचली आहे. देशातला रुग्ण बरे होण्याचा दर आता ९७.५८ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर गेल्या ८१ दिवसांपासून रुग्ण बरे होण्याचा साप्ताहिक दर सातत्याने तीन टक्क्यांच्या खालीच आहे. देशात काल दिवसभरात ३३९ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोविड आजारामुळे मृत पावलेल्यांची एकूण संख्या आता चार लाख ४३ हजार २१३ वर पोहोचली आहे.
देशात कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या एकूण नागरिकांची संख्या आता ७५ कोटी २२ लाख ३८ हजार ३२४ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासात ७८ लाख ६६ हजार ९५० नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली.
राज्यातील स्थिती
राज्यात काल २७४० नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३ हजार २३३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६३ लाख ०९ हजार ०२१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०५ टक्के आहे. राज्यात काल २७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के झाला आहे. राज्यात सध्या ४९ हजार ८८० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.