नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास २ हजारांनी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत २७ हजार १७६ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर २८४ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात २७,१७६ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ५१ हजार ०८७ वर पोहोचली. तर गेल्या काही दिवसांच्या तुलनेत काल दिवसभरातल्या कोरोनाबाधितांच्या संख्येत काहीशी घट झाल्याचं चित्र आहे. याच कालावधीत कोरोनामुळे २८४ जण मृत्युमुखी पडल्याने कोरोनामृत्यूंचा एकूण आकडा ४,४३,४९७ इतका झाला आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या ३ लाख ५१ हजार ०८७ पर्यंत वाढली असून ती एकूण कोरोनाबाधितांच्या १.०५ टक्के आहे. तर, एकूण ३,२५,२२,१७१ रुग्ण आतापर्यंत बरे झाले असून हे प्रमाण ९७.६२ टक्के इतके आहे.
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लशींच्या ७५ कोटी ८९ लाख १२ हजार २७७ मात्रा देण्यात आल्या आहेत. गेल्या २४ तासात लस टोचून घेतलेल्या नागरिकांची संख्या ६१ लाख १५ हजार ६९० वर पोहोचली आहे.
राज्यातील स्थिती
राज्यात काल ३,५३० नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३ हजार ६८५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६३ लाख १२ हजार ७०६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०६ टक्के आहे. राज्यात काल ५२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के झाला आहे. राज्यात सध्या ४९ हजार ६७१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
















