नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढीला लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत २ लाख ७६ हजार ७० रुग्णांची भर पडली असून एकाच दिवसात ३८७४ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात २४ तासांत म्हणजे बुधवारी दिवसभरात २ लाख ७६ हजार ७० नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर दिलासा देणारी बाब म्हणजे याच कालावधीत देशात ३ लाख ६९ हजार ७७ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. गेल्या २४ तासांत ३,८७४ मृत्यूंची नोंद झाली आहे. देशात एकूण मृतांची संख्या २ लाख ८७ हजार १२२ वर जाऊन पोहोचली आहे. यात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात नोंदवले गेले आहेत. महाराष्ट्रात ५९४ मृत्यू झाले आहेत. महाराष्ट्रात ३४ हजार ३१ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
महाराष्ट्रातली स्थिती
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना उतरणीला लागला आहे. दैनंदिन येणाऱ्या आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. यामुळं मोठा दिलासा मिळत आहे. आज ५१,४५७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर ३४,०३१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आजपर्यंत एकूण ४९७८९३७ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज ५९४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५४ टक्के एवढा आहे.