नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास २ हजारांनी घट झाली. गेल्या २४ तासांत ३६ हजार ०८३ नव्या रुग्णांची भर पडली असून ४९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ३७ हजार ९२७ रुग्ण कोरोनातून बरे झाले.
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ३६ हजार ०८३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर ४९३ जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी ३८,६६७ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. त्याचबरोबर, देशभरात गेल्या २४ तासांत ३७,९२७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे २३३७ सक्रिय रुग्णांमधे घट झाली आहे. देशात आतापर्यंत ३ कोटी २१ लाख ९२ लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ३ कोटी १३ लाख ७६ हजार बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. देशात सध्या ३ लाख ८५ हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशात आतापर्यंत ५४ कोटी ३८ लाख ४६ हजार २९० कोरोनावरील लसीचे डोस देण्यात आले आहेत. तर गेल्या २४ तासांत ७५ लाख ५० हजार ५५३ नागरिकांना लस देण्यात आली आहे.
राज्यातील स्थिती
राज्यात शनिवारी दिवसभरात कोरोनातून बरे झालेल्यांपेक्षा नवीन बाधितांची संख्यी ही अधिक आढळली आहे. याशिवाय, कोरोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येतही मोठी भर पडली आहे. शनिवारी दिवसभरात राज्यात ५ हजार ७८७ नवीन कोरोनाबाधित आढळून आले असून, ५ हजार ३५२ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. याचबरोबर १३४ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.