नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत ४५ हजार ०८३ कोरोनाबाधितांची नोदं झाली आहे. तर ४६० कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ४५ हजार ०८३ कोरोनाबाधित आढळले असून ४६० जणांचा मृत्यू झाला आहे. ३५ हजार ८४० रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. नवीन रुग्णांसह देशातील आतापर्यंतच्या बाधितांची संख्या ३ कोटी २६ लाख ९५ हजार ३० झाली आहेत. तर मृतांची एकूण संख्या ४ लाख ३७ हजार ८३०वर पोहोचली आहे. देशाचा रिकव्हरी रेट सध्या ९७.५३ टक्क्यांवर आहे. देशात सध्या ३ लाख ६८ हजार ५५८ सक्रिय रुग्ण उपचाराधिन आहेत. तर आतापर्यंत ३ कोटी १८ लाख ८८ हजार ६४२ जण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. दरम्यान, देशाचा विकली पॉझिटीव्हीटी रेट २.२८ टक्क्यांवर आहे. गेल्या ६५ दिवसांपासून हा दर तीन टक्क्यांपेक्षा खाली आहे. तर डेली पॉझिटीव्हीटी रेट देखील गेल्या ३४ दिवसांपासून तीन टक्क्यांपेक्षा कमी २.५७ टक्क्यांवर आहे. तसेच लसीकरण मोहिमेंतर्गत गेल्या २४ तासांत ७३.८ लाख लोकांचं लसीकरण करण्यात आलं. तर आतापर्यंत एकूण ६३.०९ कोटी लोकांचं लसीकरण पूर्ण झालंय.
केरळमध्ये रुग्णसंख्येत वाढ कायम
शनिवारी दिवसभरात सापडलेल्या एकूण रुग्णांपैकी ३१ हजार २६५ कोरोनाबाधित एकट्या केरळ राज्यातील आहेत. तसेच १५३ राज्यात १५३ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून ३० हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत.
राज्यातील स्थिती
राज्यात काल ४,८३१ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४ हजार ४५५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६२ लाख ५९ हजार ९०६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०२ टक्के आहे. राज्यात काल १२६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के झाला आहे. राज्यात सध्या ५१ हजार ८२१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.