नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मागील २४ तासांमध्ये देशभरात ५३ हजार ३७० नवे कोरोनाबाधित आढळले, तर ६५० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता ७८ लाख १४ हजार ६८२ वर पोहचली आहे. देशातील एकूण ७८ लाख १४ हजार ६८२ करोनाबाधितांच्या संख्येत ६ लाख ८० हजार ६८० अॅक्टिव केसेस, डिस्चार्ज मिळालेले ७० लाख १६ हजार ४६ जणांचा समावेश आहे. २३ ऑक्टोबर पर्यंत देशात १०,१३,८२,५६४ नमून्यांची करोनाच्या पार्श्वभूमीवर तपासणी करण्यात आली. ज्यापैकी १२ लाख ६९ हजार ४७९ नमने काल तपासण्यात आले. आयसीएमआर कडून ही माहिती मिळाली आहे.दरम्यान, ऑक्सफोर्डच्या लशीनंतर आता सर्वाचं लक्ष भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या लशीकडे लागलं आहे. नुकतंच या कंपनीच्या लशीला तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी मिळाली आहे. याच दरम्यान भारत बायोटेक कंपनीने मोठा दावा केला आहे. जून 2021 पर्यंत ही लस उपलब्ध होईल असा कंपनीने दावा केला आहे. सध्या भारत बायोटेक कंपनी कोव्हॅक्सिनवर काम करत असून तिसऱ्या टप्प्यातील चाचणी नोव्हेंबरपासून सुरू होऊ शकते अशी माहिती मिळाली आहे.