नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत पाच हजारांनी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात ६७ हजार २०८ नव्या रुग्णांची भर पडली आहे तर २३३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या दिलेल्या माहितीनुसार, देशातील करोनाची परीस्थिती आटोक्यात येत आहे. देशात गेल्या २४ तासात ६२,२०८ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर १,०३,५७० जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच २,३३० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत २,९७,००,३१३ रुग्ण आढळले आहेत. तर २,८४,९१,६७० बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. ३,८१,९०३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशात ८,२६,७४० बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
राज्यातील कोरोनाची स्थिती
राज्यात बुधवारी १० हजार १०७ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर १० हजार ५६७ कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. बुधवारी २३७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात सध्या एकूण १,३६,६६१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. सरकारी आकडेवारीनुसार राज्यातील २१ जिल्हे आणि मनपा क्षेत्रात एकाही मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही तर १२ ठिकाणी केवळ एका मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.९४ टक्के एवढा आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लसीकरण सुरु आहे. आतापर्यंत देशात २६,५५,१९,२५१ जणांना लस देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १८ ते ४४ वयोगटासाठी देखील मोफत लसीकरण करण्याची घोषणा केली होती. यासाठी केंद्र सरकारच लस खरेदी करून ती राज्य सरकारांना पुरवणार असून एकूण ७५ टक्के लसींचे डोस केंद्र सरकार तर २५ टक्के लसीचे डोस हे खासगी क्षेत्रामध्ये विक्री होतील, अशी देखील घोषणा पंतप्रधानांनी केली होती. त्यानुसार आता केंद्र सरकारने मोफत लसीकरणाची तयारी सुरू केली असून त्यासाठी लसीच्या तब्बल ७४ कोटी डोसची ऑर्डर केंद्र सरकारने दिली आहे. यामध्ये कोविशिल्ड, कोवॅक्सिन आणि बायोलॉजिकल ई या तीन प्रकारच्या डोसचा समावेश आहे. निती आयोगाचे आरोग्यविषयक सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी यासंदर्भात दुपारी पत्रकार परिषदेत घोषणा केली.
















