जळगाव (प्रतिनिधी) स्वस्तात मोबाईल देण्याच्या नावाखाली एकाने जळगावच्या तरुणाची तब्बल पावणे बारा लाखांत फसवणूक केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात पुण्याच्या दीपक प्रभू (रा.बाणेर) नामक व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या संदर्भात प्रथमेश विनायक राणे (वय १८, व्यवसाय शिक्षण, रा. गणेश कॉलनी जळगाव) या तरुणाने फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, दीपक प्रभू याने दि. ८ फेब्रुवारी २०२२ ते १३ मार्च २०२२ या कालावधीत प्रथमेशला कमी किमतीत मोबाईल देतो, असे खोटे सांगत, त्याच्याकडून अॅडव्हान्स पेमेंट म्हणून ११ लाख ७५ हजार रुपये ऑनलाईन घेतले. परंतू अनेक दिवस उलटूनही मोबाईल दिले नाही. एवढेच नव्हे तर प्रथमेशने आपले पैसे परत देण्याची मागणी केली असता दीपक प्रभूने तुझ्याविरुध्द खंडणीचा गुन्हा दाखल करेल. तुला पाहुन घेईल, अशी धमकी दिली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि दिपक जगदाळे हे करीत आहे.