जळगाव (प्रतिनिधी) माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी बीएचआर घोटाळ्याशी संबंधित दिलेल्या कागद पत्रांनुसार शहरातील खान्देश कॉप्लेक्सचा पत्ता असलेल्या श्री.साई मार्केटिंग अँड ट्रेडिंग कंपनीने काही मालमत्ता खरेदी केल्या आहेत. तर काही खरेदी करायच्या बाकी आहेत. ही कंपनी सुरज सुनील झंवर व कैलास रामप्रसाद सोमाणी यांच्या नावावर असून ७ सप्टेंबर २०१५ स्थापन झाली असल्याची माहिती ऑनलाईन दिसत आहे.
आज एकनाथराव खडसे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत काही कागदपत्र दिली. त्यात ‘बीएचआर’ची मालमत्ता कवडी मोल दरात घेणाऱ्यांची नाव त्यांनी दिली. त्यानुसार ३० व्यक्ती, संस्थांची नाव दिली. त्यात जळगाव,पुणे, जामनेर, पाळधी (धरणगाव) येथील लोकांचा समावेश आहे. झंवर आणि सोमाणी यांची श्री.साई मार्केटिंग अँड ट्रेडिंग कंपनीने नशिराबाद येथील दुकानांसाठी १९ लाख ५१ हजार ५०० रुपयांची निविदा भरली असून खरेदी अद्याप बाकी आहे. दुकान क्रमांक १६,१७,१८,१८-अ, कोहिनूर आर्केड, निगडी पुणे) ही २ कोटी ११ लाख अकरा हजार १११ रुपयात खरेदी केली आहेत. तसेच प्लॉट नं. ५६८/१० भाग अ,ब,क,ड रांगले निवास घोले रोड पुणे ही मिळकत ३ कोटी ११ लाख ३३ हजार १११ रुपयात खरेदी केली आहे. नाशिकरोड येथील दुकान नंबर ३,४,५ आनंद प्लाझा ही मिळकत ९४ लाख ११ हजार एवढी शासकीय निविदा भरली असून अद्याप खरेदी बाकी आहे. योगेश रामचंद्र लोढा (पाळधी ता.धरणगाव) यांनी पिंपळे गुरव पुणे येथील दुकान नं.४ हे ४९ लाख ९९ हजार ९९९ रुपयात खरेदी केले आहे. यासह आणखी काही नावं आहेत.
















