चोपडा (प्रतिनिधी) येथील विवेकानंद विद्यालयात 30 जुलै 2023 रोजी सकाळी आठ ते दुपारी साडेबारा या वेळात सुप्रसिद्ध गायक पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे ज्येष्ठ शिष्य पंडित डॉक्टर राजा काळे (मुंबई) यांचे गायन या विषयावर एक दिवसाचे शिबिर संपन्न झाले.
शिबिराची सुरुवात सरस्वती देवीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. पंडित डॉक्टर राजा काळे व त्यांच्या सोबत हार्मोनियम वादनासाठी वसई येथून आलेले श्याम जोशी या दोघांचा यथोचित सन्मान करण्यात आला. तबल्याची साथ नरेंद्र भावे व श्रेयस भावे यांनी केली. संगीत विषय मानवी जीवनात किती महत्त्वाचा व अर्थपूर्ण आहे,या संदर्भात साध्या सोप्या भाषेत माहिती देत गायन कलेबद्दल छोट्या छोट्या पण खूप महत्त्वाच्या गोष्टींचे पंडितजींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत, गायन कला कशी आत्मसात करावी?,कसा सराव करावा याचे मोलाचे मार्गदर्शन प्रात्यक्षिकासह केले. तसेच काही नवनवीन रचना विद्यार्थ्यांकडून गाऊनही घेतल्या.
कोणती एक कला आत्मसाथ केल्यामुळे माणूस चांगल्या संस्कारांनी कसा घडतो, त्याच्यात चांगली मूल्ये कशी रुजतात,हे उत्तम उदाहरणांसह दाखले दिले. देशात, परदेशात मोठमोठ्या मैफल गाजवणारे पंडितजी सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या चोपडा या छोट्याशा शहरातील विवेकानंद विद्यालयात येणे व तेथील विद्यार्थ्यांना गायन कलेबद्दल शिक्षण देणे हे विद्यालयाचे व विद्यार्थ्यांचे भाग्यच. विद्यालयातील व चोपडा शहरातील संगीत विषयाचे क्लास करणारे विद्यार्थी असे मिळून शेकडो विद्यार्थ्यांनी शिबिर यशस्वीरित्या पूर्ण केले. त्याबद्दल विद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र ही देण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विकास हरताळकर ,सचिव अॅड. रवींद्र जैन, सहसचिव डॉ. विनीत हरताळकर, विलास पाटील सर खेडीभोकरीकर, विश्वस्त व मुख्याध्यापक नरेंद्र भावे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका आशा चित्ते ,यांच्यासह सर्व विभागाचे शिक्षकवृंद ,गावात संगित क्लास चालवणारे संगीत शिक्षक, संगीत प्रेमी पालक वर्ग, श्रोते उपस्थित होते. शिबिराचे फलक लेखन व शिबिरार्थी विद्यार्थ्यांची पूर्वतयारी कलाशिक्षक राकेश विसपुते यांनी केली, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन उपशिक्षिका माधुरी हळपे व आभार प्रदर्शन मुख्याध्यापक नरेंद्र भावे यांनी केले. शिबिर संपन्नतेसाठी पवन लाठी यांच्यासह सर्व शिक्षकवृंद, कर्मचारीवृंद यांनी परिश्रम घेतले.