जळगाव (प्रतिनिधी) ‘विकेल ते पिकेल’ या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतील संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियानातंर्गत जळगाव शहरातील काव्य रत्नावली चौकात फळे व भाजीपाला विक्री केंद्राचे उद्घाटन शेतीमाल उत्पादक प्रतिनिधी सुमनबाई हरी ढाके यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकुर, कृषि उपसंचालक अनिल भोकरे, कृषि विकास अधिकारी मधुकरराव चौधरी आदि प्रामुख्याने उपस्थित होते. या योजनेतंर्गत शेतकरी व शेतकरी गटांमार्फत उत्पादित केलेला शेतमाल ग्राहकास थेट विक्री केंद्रावर खरेदी करता येणार आहे. या ठिकाणी ग्राहकांनी फळे, भाजीपाला, मशरुम, पपई खरेदी केली. यावेळी १५ हजार रुपयांचा शेतमाल विक्री करण्यात आला. ग्राहकांना एकाच ठिकाणी उच्च प्रतीची फळे व भाजीपाला उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना विक्री केंद्रावर योग्य भाव मिळून त्यांचे जीवनमान उंचवण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.