जळगाव (प्रतिनिधी) गरीब, होतकरू, बेरोजगार युवक-युवतींना मोफत प्रशिक्षणातून नोकरी तथा व्यवसायातून अर्थार्जनाचे साधन उपलब्ध करून देण्याची खात्री असलेल्या प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचा शुभारंभ राज्यात ५११ ठिकाणी तर जळगाव जिल्ह्यातील २४ ठिकाणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे एकाचवेळी करण्यात आला.
कार्यक्रमास मुंबई येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा , मुख्य सचिव मनोज सौनिक हे उपस्थित होते. तर जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, तर कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त वि.जा.मुकणे आसोदा येथून सहभागी झाले होते. तसेच जिल्ह्यातील २४ केंद्रांवर सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नागरिक व सुशिक्षित बेरोजगार तरूण दूरदृष्यप्रणालीद्वारे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
जिल्ह्यातील २४ केंद्राचा शुभारंभ !
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यासह जिल्हयातील जळगाव तालुक्यातील आसोदा, भुसावळ तालुक्यातील कंडारी व खडके, पारोळा तालुक्यातील तामसवाडी व शिरसमणी, बोदवड मधील शेलवड , एरंडोल तालुक्यातील कासोदा व आडगाव, यावल मधील न्हावी, रावेर तालुक्यात चिनावल, मुक्ताईनगर तालुक्यात अंतुर्ली, चोपडा तालुक्यात अडावद,यावल तालुक्यात किनगाव, जामनेर तालुक्यात पहूरपेठ, अमळनेरमध्ये मांडळ, रावेर तालुक्यात अहिरेवाडी व निंभोरे , चाळीसगावमध्ये टाकळी तसेच पाचोरा तालुक्यात पिंपळगाव या ठिकाणच्या केंद्रांचा दूरदृष्य प्रणालीद्वारे शुभारंभ करण्यात आला.