मुंबई (वृत्तसंस्था) अण्णाद्रमुकच्या आमदाराच्या ड्रायव्हरच्या घरावर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. यावेळी अधिकाऱ्यांना एक कोटी रुपये सापडले. हे पैसे आयकर विभागाने जप्त केले आहेत.
इन्कम टॅक्सच्या छापेमारीमध्ये अण्णाद्रमुकच्या आमदार के. चंद्रशेखर या आमदाराच्या ड्रायव्हरकडे १ कोटी रक्कम सापडली. आयकर विभागाकडून ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. या चालकाचं नाव अलगरासामी (वय ३८) असून त्यांच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम सापडल्याने खळबळ उडाली आहे. तामिळनाडूच्या त्रिची जिल्ह्यातील मनाप्पराई मतदार संघाचे चंद्रशेखर हे आमदार आहेत. गेली १० वर्ष अलगरासामी चंद्रशेखर यांच्याबरोबर काम करतात. आता तिसऱ्यांदा त्यांची अण्णाद्रमुकचा उमेदवार म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या वालासुपत्ती याठिकाणी थंगपंडी (वय ५६) आणि कोट्टाइपट्टी मधील आनंद (वय ३२) यांच्या घरावर देखील छापेमारी करण्यात आली. चंद्रशेखर यांच्या अन्य दोन साथीदारांची ही ठिकाणं आहेत.
एसपी जयाचंद्रन यांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर यांच्या घराजवळ असणाऱ्या निवासस्थानाजवळ रविवारी रात्री आयकर विभागाने ही छापेमारी केली होती. कोणतेही कागदपत्र किंवा आवश्यक माहितीशिवाय ठेवण्यात आलेले १ कोटी रुपये यावेळी जप्त करण्यात आले. अलगरासामीकडे ५०० रुपयांच्या नोटांच्या स्वरुपात ही रक्कम जप्त करण्यात आली होती. ५०० रुपयांच्या एकूण २०००० नोटा जप्त करण्यात आल्या. त्रिची इन्कम टॅक्स को-डिरेक्टर मदन कुमार यांच्या नेतृत्त्वाखाली तीन पथकांनी या तिन्ही साथीदारांच्या घरी छापेपारी केली. इन्कम टॅक्सकडे अशी माहिती आली होती की मतदारांना पैसेवाटप केले जात आहे. अशा काही घटना समोर आल्यानंतर इन्कम टॅक्सने कारवाई करत ही रक्कम जप्त केली आहे.
तामिळनाडू निवडणूक कार्यक्रम
तामिळनाडूमध्ये विधानसभेच्या २३४ जागांवर ६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर २ मे रोजी मतमोजणी होईल. यावेळी विधानसभेच्या निवडणुका केवळ एकाच टप्प्यात होत आहेत. यावेळी कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन केले जाईल. यासह मतदानाची वेळही एक तासाने वाढविण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली.