मुंबई (वृत्तसंस्था) शासकीय आयुर्वेद महाविद्यालयांमधील आयुर्वेद पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात 1 मे 2020 पासून दरमहा 10 हजार रुपये इतकी वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. शासकीय वैद्यकीय व दंत महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना यापूर्वीच विद्यावेतन वाढ देण्यात आली आहे.
सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता वैद्यकीय डॉक्टरांची नितांत आवश्यकता असल्याने सदरील निर्णय घेण्यात आला. राज्यात 4 शासकीय आयुर्वेद महाविद्यालयांमध्ये 550 पदव्युत्तर विद्यार्थी असून या वाढीव विद्यावेतनाच्या निर्णयामुळे 6 कोटी 60 लाख रुपये इतका अतिरिक्त आर्थिक भार पडेल.
या वाढीव विद्यावेतनामुळे या डॉक्टरांचा एकूण प्रति महिना विद्यावेतन आता कनिष्ठ निवासी-1 पदासाठी रुपये 64551, कनिष्ठ निवासी-2 पदासाठी रुपये 65112 आणि कनिष्ठ निवासी-3 साठी रुपये 65673 इतके होईल.