मुंबई (वृत्तसंस्था) वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक झाली असून २६ नोव्हेंबरला राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मनसे मोर्चा काढणार आहे. वीज दरात सवलत देण्याचं आश्वासन राज्य सरकारने दिले होते. पण ते पाळले गेले नाही. त्यामुळे जनतेच्या प्रश्नासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागत असल्याचे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे.
वांद्रे इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयावरही मनसेकडून २६ नोव्हेंबरला मोर्चा काढण्यात येणार आहे. यात मनसेचे नेते आणि कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिकही सहभागी होणार असल्याची माहिती नांदगावकर यांनी दिली आहे. ज्यांना वीज बिलाचा शॉक बसला आहे, अशा सर्व नागरिकांनी या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन मनसेकडून करण्यात आले आहे. मनसेचे राज्यभरातील मोर्चे अत्यंत शांतपणे काढले जातील असे नांदगावकर यांनी आवर्जुन सांगितले. ‘राज्य सरकारने वीज दरवाढीत सवलत देण्याचे आश्वासन दिले होते. ते पाळले नाही. आता पुन्हा एकदा १०० युनिटपर्यंत सूट देण्याचे आश्वासन ऊर्जामंत्री देत आहेत. या सरकारमध्ये सगळा सावळा गोंधळ सुरु आहे,’ अशी टीका नांदगावकर यांनी यावेळी केली.