लंडन (वृत्तसंस्था) भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. प्रशिक्षक रवी शास्त्री यांची लेटरल फ्लो टेस्ट काल शनिवारी संध्याकाळी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने खबरदारी म्हणून मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह चार आयसोलेट केलं आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेचा चौथा सामना ओव्हलवर खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने आपल्या दुसऱ्या डावात दमदार फलंदाजी करत इंग्लंडसमोर १७१ धावांची आघाडी घेतली आहे. आज या कसोटीचा चौथा दिवस असून सामन्याच्या निकालाचे चित्र थोडेफार स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आज दोन्ही संघांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले होते, पण काही वेळापूर्वीच टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्रींची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर आणि फिजिओथेरपिस्ट नितीन पटेल यांना संघाच्या उर्वरित सदस्यांपासून वेगळे करण्यात आले आहे. त्यामुळे भारतीय संघ चौथ्या दिवसाचा खेळ आपल्या प्रशिक्षकांच्या अनुपस्थितीत खेळत आहे. “बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने श्री रवी शास्त्री, मुख्य प्रशिक्षक, श्री बी. अरुण, गोलंदाजी प्रशिक्षक, श्री आर. श्रीधर, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आणि श्री नितीन पटेल, फिजिओथेरपिस्ट, सावधगिरीचा उपाय म्हणून काल संध्याकाळी शास्त्री यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर आयसोलेट केले आहे”, असे बीसीसीआयने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. या सर्वांची आरटी-पीसीआर चाचणी झाली असून ते टीम हॉटेलमध्ये राहतील आणि वैद्यकीय टीमकडून माहिती येईपर्यंत टीम इंडियासोबत प्रवास करणार नाहीत, असेही सांगण्यात आले आहे.