टोकयो (वृत्तसंस्था) सर्व भारतीयांचे लक्ष असलेल्या टोकियो ऑलिम्पिकमधील पुरुष हॉकीच्या सेमीफायनलमध्ये भारताचे पदकाचे स्वप्न भंग झाले आहे. भारत आणि बेल्जियम यांच्यात झालेल्या सेमीफायनलमध्ये बेल्जीयमने भारताचा पराभव केला आहे. सुरुवातीला मॅच खूपच अटीतटीची झाली मात्र भारतीय हॉकी संघाला विश्वविजेत्या बेल्जियमने ५-२ ने पराभूत केले.
आठ सुवर्णपदकांसह ११ ऑलिम्पिक पदके खात्यावर असणाऱ्या भारताने एके काळी हॉकीमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवले होते. मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील सध्याच्या भारतीय संघाला त्या यशाची पुनरावृत्ती साद घालत असतानाच बेल्जियमकडून झालेल्या पराभवामुळे भारतीय संघाची टोकयो ऑलिम्पिकमधील ही ड्रीम रन संपुष्टात आली. उपांत्य फेरीमध्ये भारत कशी कामगिरी करतो याकडे सर्व जगाचं लक्ष लागलं होतं. मात्र पहिल्या हाफमध्ये सामना बरोबरीत राखण्यात यश आल्यानंतर भारतीय संघाला तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये एकही गोल करता आला नाही. भारत आता कांस्यपदकासाठी खेळणार आहे.
पहिल्या पाच मिनिटांमध्ये बेल्जियमने सामन्यावर वर्चस्व गाजवलं. सामना सुरु झाल्यानंतर काही मिनिटांमध्येच बेल्जियमने गोल करत १-० ची आघाडी घेतली. मात्र त्यानंतर भारताने दोन मिनिटांच्या अंतरात एकामागोमाग एक दोन गोल करत २-० ने आघाडी मिळवली. पहिल्या क्वार्टरमध्ये भारताने २-१ ची आघाडी कायम ठेवली. दुसऱ्या क्वार्टरमध्ये केवळ एक गोल झाला. बेल्जियमने केलेल्या या एकमेव गोलमुळे हाफ टाइमनंतर सामना २-२ च्या बरोबरीत राहिला. मात्र तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाला एकही गोल करता आला नाही. दुसरीकडे बेल्जियमने शेवटच्या क्वार्टरमध्ये तीन गोल झळकावले.
बेल्जियमकडून अॅलेक्झॅण्डर हेनरीक्सने हॅटट्रीक केली. भारताला पहिल्या दोन क्वार्टरमध्ये बेल्जियमला बरोबरीत रोखण्यात यश आलं. तिसऱ्या क्वार्टरमध्ये एकाही संघाला गोल करता आला नाही. नंतर मात्र बेल्जियमला एकापाठोपाठ एक अनेक पेनल्टी कॉर्नर मिळाले आणि त्यांनी संधीचं सोनं करत भारतावर आघाडी मिळवली. नंतर ही आघाडी कायम ठेवत बेल्जियमने ५-२ ने सामना जिंकला. बेल्जियमने आपल्या पाच पैकी चार गोल पेनल्टी कॉर्नरवर केले. बेल्जियम यंदा पुन्हा एकदा अंतिम सामन्यात खेळणार आहे. रियो ऑलिम्पिकमध्ये बेल्जियमला रौप्यपदक मिळालं होतं.