मुंबई (वृत्तसंस्था) भारताचे ‘फ्लाईंग सिख’ असलेले महान माजी धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन झाले आहे. ते ९१ वर्षांचे होते. कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर बुधवारी मिल्खा सिंग यांना जनरल ICU मध्ये ठेवण्यात आले. मात्र, त्यानंतर अचानक आलेला ताप आणि ऑक्सिजन पातळीत झालेली घसरण यामुळे मिल्खा सिंग यांची प्रकृती खालावली. ते मोहालीतील एका रुग्णालयात दाखल होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मिल्खा सिंग यांच्या पत्नीचेही कोरोनामुळे निधन झाले होते.
मिल्खा सिंग हे १९५६ साली मेलबर्न ऑलिम्पिकमध्ये अगदीच रांगडा खेळाडू म्हणून उतरले होते. त्यावर्षी त्यांची कामगिरी काही खास राहिली नाही. पण पुढील काही वर्षात मिल्खा सिंग यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि त्याचे परिणाम देखील दिसू लागले. मिल्खा सिंग यांनी राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. २०० मीर आणि ४०० मीटरच्या शर्यतीत राष्ट्रीय विक्रम मिल्खा सिंग यांच्या नावावर जमा झाला. फक्त रोम ऑलिम्पिक पुरतेच मिल्खा सिंग मर्यादित नव्हते. भारतीय ट्रॅक अँड फिल्डमध्ये त्यांची कामगिरी जबरदस्त राहिली आहे.
खेळाप्रती अतिशय समर्पित भावना आणि त्यांची जिंकण्याची जिद्द अतिशय कमालीची होती. १९५८ साली टोकियो आशियाई स्पर्धेत मिल्खा सिंग यांनी २०० मीटर आणि ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्ण पदकाची कमाई केली. मेलबर्न ऑलिम्पिकच्या फायनल इव्हेंटमध्ये ते पात्र ठरू शकले नव्हते. पण त्यामुळे ते खचून गेले नाहीत. त्यांनी नेहमीच प्रगतीचा ध्यास अंगी बाणला होता आणि ते त्यांच्या एकंदर व्यक्तीमत्वातून नेहमी दिसून यायचं. अपयशावर मात करण्यासाठी स्वत:मध्ये कसे बदल करता येतील याचाच ते सतत विचार करायचे. त्यांनी अमेरिकेचे चार्ल्स जेनकिंस यांच्यासोबतही चर्चा केली. जेनकिंस हे ४०० मीटर आणि ४x४०० मीटर रिले प्रकारातील सुवर्ण पदक विजेते खेळाडू होते. जेनकिंस नेमका कसा सराव करतात, त्यांचा दिवस नेमका कसा असतो अशी सर्व माहिती त्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि जेनकिंस यांनीही मोठ्या मनानं मिल्खा सिंग यांची मदत केली.
मिल्खा सिंग २७ वर्षांचे होते आणि त्यानंतर पुढची दोन वर्ष त्यांनी जेनकिंस यांना फॉलो केलं. त्याचा फायदा देखील झालेला पाहायला मिळाला. मिल्खा सिंग यांनी १९५८ साली आशियाई स्पर्धेत राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. मिल्खा सिंग यांना ४०० मीटर शर्यतीत खूप रस होता. त्यांनी ४७ सेकंदात अंतर पूर्ण करुन सुवर्ण पदकाची कमाई केली होती. तर शर्यत पूर्णकरण्यासाठी रौप्य पदक विजेत्या पाब्लो सोमब्लिंगो यांच्यापेक्षा दोन सेकंद कमी वेळ मिल्खा सिंग यांना लागला होता.
मिल्खा सिंग यांनी जिंकलेलं दुसरं सुवर्ण पदक अतिशय खास ठरलं. २०० मीटर प्रकारात भारताचा पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या अब्दुल खालिद याला मिल्खा सिंग यांनी पराभूत केलं होतं. खालिदवर मात करणं तितकं सोपं नव्हतं. कारण तोही १०० मीटर प्रकारात विक्रमवीर खेळाडू होता. वाऱ्याच्या वेगानं धावणारा खेळाडू म्हणून त्याची ओळख होती. पण तुमचा फॉर्म जबरदस्त सुरू असेल तर त्यापुढे काहीच टीकत नाही आणि त्यावेळी मिल्खा सिंग जबरदस्त फॉर्मात होते. मिल्खा सिंग यांनी पाकिस्तानच्या अब्दुल खालिद याला नमवून २१.६ सेकंदात स्पर्धा जिंकून सुवर्ण पदकाची कमाई केली होती. केवळ सुवर्ण पदकच जिंकलं नाही, तर नव्या विक्रमाची नोंद मिल्खा सिंग यांनी केली. पण फिनिशिंग लाइन जवळ जेव्हा ते पोहोचले तेव्हा मांडीचे स्नायू ताणले गेल्यानं ते जागेवरच खाली पडले होते.
आशियाई स्पर्धेत दोन सुवर्णपदकांची कमाई केल्यानंतर मिल्खा सिंग यांचा प्रवास काही इथवरच थांबला नाही. कारण आता वेळ होती कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताची ओळख निर्माण करुन देण्याची. भारतीय अॅथलेटिक्स विश्वात मिल्खा सिंग यांनी देशाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचं काम केलं होतं. त्यामुळे प्रत्येक भारतीयाला मिल्खा सिंग यांचा अभिमान वाटू लागला होता. यावेळी कॉमनवेल्थ गेम्समध्ये जगातील नावाजलेल्या खेळाडूंसमोर मिल्खा सिंग यांना स्वत:ला सिद्ध करुन दाखवण्याची वेळ होती.
कॉमनवेल्थ गेम्समध्येही ४०० मीटर प्रकारात मिल्खा सिंग यांनी सुवर्ण पदकाची कमाई केली. पण या स्पर्धेत सुवर्ण पदकाचा मानकरी ठरेन असा विश्वास खुद्द मिल्खा सिंग यांनाही नव्हता. त्यांनी स्वत: तसं बोलून दाखवलं होतं. “कॉमनवेल्थ गेम्समध्ये मी सुवर्णपदक जिंकेन असं मला अजिबात वाटलं नव्हतं. कारण मी विश्वविक्रमी मेलकम स्पेन्ससोबत धावत होतो. ते ४०० मीटर प्रकारातील उत्कृष्ट खेळाडू होते”. मिल्खा सिंग यांनीही जोरदार तयारी केली होती. त्यांचे अमेरिकी प्रशिक्षक डॉ. आर्थर हावर्ड यांनी स्पेन्स याची रणनिती ओळखली होती. स्पेन्स शर्यतीत सुरुवातीच्या टप्प्यात हातचं राखून धावायचा आणि अखेरच्या टप्प्यात वेग घ्यायचा. याचाच फायदा मिल्खा सिंग यांनी घेतला. त्यांनी आपण शर्यतीच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून ते अखेरच्या टप्प्यापर्यंत वेग कायम ठेवण्यासाठी जीवतोड मेहनत घ्यायची असं मनाशी पक्कं केलं होतं. मिल्खा सिंग यांची रणनिती यशस्वी देखील झाली आणि ४४० यार्डाच्या शर्यतीत मिल्खा सिंग अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आघाडीवरच राहिले. ४६.६ सेकंदात शर्यत पूर्ण करुन त्यांनी नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवला.