रावेर (प्रतिनिधी) तालुक्यातील वाघोदा बु.येथील लोकनियुक्त सरपंच मुकेश तायडे अपात्र असल्याचा ठपका ठेवत त्यांची निवड जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केली आहे. निवडून आल्यावर त्यांनी मुदतीत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय जारी केला आहे.
याबाबत वृत्त असे की, वाघोदा बुद्रुक (ता. रावेर) येथील लोकनियुक्त सरपंच मुकेश तायडे यांनी त्यांचे जातपडताळणी प्रमाणपत्र मुदतीत सादर न केल्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी त्यांना अपात्र ठरविले आहे. याबाबत मुबारक तडवी यांनी तक्रार केली होती. वाघोदा बुद्रुक येथील ग्रामपंचायतीच्या २०१७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत अनुसूचित जमाती राखीव जागेतून निकाल घोषित झाल्यापासून तायडे यांनी एक वर्ष मुदतीच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्याने अर्जदार यांनी १ जानेवारी २०२० ला कार्यालयात विवाद अर्ज सादर केला आहे. विवाद अर्जावर निर्णय घेण्यापूर्वी या प्रकरणी चौकशी करणे आवश्यक असल्याने तहसीलदार रावेर यांच्याकडे पत्र देऊन चौकशी अहवाल सादर करण्याबाबत कळविले होते. त्यानुसार तहसीलदार रावेर यांनी अहवाल सादर केलेला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून ४ डिसेंबर २०२० ला प्रकरण निर्णयार्थ बंद करण्यात आले. सरपंच तायडे हे टोकरे कोळी जातीचे आहेत. परंतु त्यांना दिलेली कायदेशीर मुदत संपुष्टात आल्यानंतरही आजपर्यंत जातवैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्याने त्यांचे ग्रामपंचायत सदस्यपद रद्द करण्यात यावे, यासाठी हा विवाद अर्ज दाखल केला होता.
निवडणुक आयोगाच्या परिपत्रकानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या सदस्याने विहित मुदतीत वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास अशा सदस्याची निवड पूर्वलक्षी प्रभावाने रद्द ठरवली जाते रावेरचे तहसिलदार यांनी ६ मार्च, २०२० रोजी सविस्तर अहवाल सादर करुन प्रतिवादी लोकनियुक्त सरपंच यांनी शासनाच्या सुधारीत अध्यादेशानुसार मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र दाखल केले नाही असा स्पष्ट अहवाल दिलेला आहे.
अर्जावर तायडे यांनी आपली बाजू वेळोवेळी संधी देऊनही मांडली नाही. तहसीलदार रावेर यांनी चौकशी अहवाल सादर केला. ग्रामपंचायतीच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत अनुसूचित जमाती राखीव प्रवर्गातून सरपंचपदी निवडून आलेले आहेत. निवडून आल्यापासून एक वर्षाच्या आत जातवैधता पडताळणी समिती यांच्याकडून करून जातवैधता प्रमाणपत्र सादर केलेले नाही. त्या मुळे त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र घोषित केले. दरम्यान, निकालानंतर गावातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.