जळगाव (प्रतिनिधी) घरातील पाळीव कुत्र्याला जेवण न दिल्याचा राग आल्याने संतापलेल्या पतीने पत्नीच्या हातावर पाय ठेवून जेवणाच्या फायबरच्या प्लेटा फोडून हाताला गंभीर दुखापत केल्याची धक्कादायक घटना नशिराबाद येथील पेठ भागात घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील नशिराबादमधील पेठ भागात आचल ज्ञानेश्र्वर नाथ या विवाहिता वास्तव्यास आहे. त्यांच्याकडे पाळीव कुत्रा असून दि. २३ रोजी त्यांनी आपल्या कुत्र्याला जेवण दिले नाही. त्याचा राग आल्याने संतापलेल्या त्यांच्या पती ज्ञानेश्र्वर नाथ यांनी पत्नीसह त्यांच्या आई वडीलांना शिवीगाळ केली. तसेच पत्नीच्या हातावर पाय ठेवून त्यांच्या दोन्ही हातांवर जेवणाच्या फायबरच्या प्लेटा फोडल्या. यामुळे आचल नाथ या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांनी लागलीच नशिराबाद पोलिसात जावून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन ज्ञानेश्र्वर नाथ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.