यावल (प्रतिनिधी) यावल तालुक्यात किनगावजवळ पपई वाहून नेणारे वाहन उलटल्याने १५ मजुरांचा मृत्यू झाला. या भीषण अपघाताने समाजमन सुन्न झाले असतांना आता विशेष पोलीस महानिरिक्षक प्रताप दिघावकर यांनी अपघात स्थळाची पाहणी केली आहे.
नेर (धुळे) येथून पपईने भरून आयशर रावेरला येत असतांना मध्यरात्रीच्या सुमारास किनगाव नजिक मोठा अपघात झाला आहे. आयशर पलटी झाल्याने यात असणारे १५ जण जागीच ठार झाल्याची दुदैवी घटना घडली. या ट्रकमध्ये एकूण २१ मजूर होते. या अपघातात १५ मजुरांचा मृत्यू झाल्याने परिसर हादरला आहे. मयत सर्व जण हे रावेर तालुक्यातील रहिवासी असून अत्यंत गरीब कुटुंबातले होते. त्यांच्या मृत्यूने परिसरावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, आज दुपारी विशेष पोलीस महानिरिक्षक प्रताप दिघावकर यांनी अपघातस्थळाला भेट दिली. या अपघाताबाबत त्यांनी जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधून माहिती जाणून घेतली. याप्रसंगी त्यांच्या सोबत जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे, अप्पर अधिक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.