चोपडा (प्रतिनिधी) भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिल्यामुळे एक जण जागीच ठार, तर दुसरा गंभीर जखमी झाला. चोपडा-मामलदे रस्त्यावर बुधवारी सायंकाळी हा साडेसात वाजता अपघात झाला.
तालुक्यातील कृष्णापूर येथील रहिवासी सुकलाल केना बारेला (वय २५) व सुनील मधुकर बारेला (वय २६) हे चोपड्यातून बाजार करून घरी जात होते. त्यावेळी चोपडा मामलदे रस्त्यावर समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरने (क्र.एम.एच.१८-४४१५) दुचाकीला (क्र.एम.एच.०४ – जी.के. ६१४७) धडक दिली. या अपघातात सुकलाल केना बारेला हा जागीच ठार झाला आहे, तर सुनील बारेला हा जखमी झाला. त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या अपघातातील मृत व जखमी ऊसतोड मजूर आहेत. मृत सुकलाल हा घरातील कर्ता असल्याने त्याचा परिवार उघडयावर आला आहे. या अपघातात दुचाकीचा चुराडा झाला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल नव्हता. मृत सुकलालच्या नातेवाईकांनी रुग्णालयात हंबरडा फोडला.
















