नाशिक (वृत्तसंस्था) सर्वधर्म समभावाचा एक स्त्युत्य अनुभव नुकताच नाशिक मध्ये आला आहे. नाशिकच्या हॉली क्रॉस चर्चमध्ये नमाज पठण करण्यात आलं आहे. ख्रिश्चन आणि मुस्लिम बांधवांनी मिळून नमाज पठण केल्याची माहिती अजमल खान यांनी दिली.
आम्ही सर्व पक्षांतील नेत्यांना इफ्तार पार्टीसाठी आमंत्रण दिले असून त्यांनी आमच्या निमंत्रणाचा स्विकार केला आहे. तसेच चर्चमधील फादरने चर्चमध्ये इफ्तार पार्टीची व्यवस्था करणार असल्याचं सांगितलं असून त्यांनी आमच्याबरोबर नमाज पठणही केलं असल्याचं अजमल खान यांनी सांगितंल आहे. त्यामुळे आता इफ्तार पार्टी चर्चमध्ये आपल्याला पहायला मिळणार आहे. राज्यभर निर्माण झालेल्या सामाजिक वादामध्ये चर्चमध्ये नमाज पठण ही समाजाच्या दृष्टीने सामाजिक ऐक्याचं दर्शन घडवणारी गोष्ट आहे.
त्यानंतर भोंग्याच्या प्रकरणावर प्रशासकीय पातळीवर पावले उचलण्यात आली असून पोलिस महासंचालक जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांशी बैठका घेऊन चर्चा करत निर्णय घेण्यात येत आहेत. नाशिकच्या पोलिस आयुक्तांनी सर्वांना भोंगे खाली उतरवण्याचे आदेश दिले होते. परवानगीशिवाय कोणत्याही धार्मिक अथवा अन्य ठिकाणी लाऊड स्पीकर लावता येणार नाही, असं दिपक पांडे यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे अनाधिकृत भोंग्यांबाबत परिपत्रक जारी करणारं नाशिक हे राज्यातील पहिलं शहर ठरलं आहे. त्यानंतर आता परवानगी नसलेल्या भोंग्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं स्पष्ट झालंय.