मुंबई (वृत्तसंस्था) शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यातले अनेक पर्याय अतिशय आकर्षक आणि भरघोस परतावा देणारे आहेत. पण, यात बरीच जोखीमही आहे. बरेच गुंतवणूकदार कमी परताव्यासह सुरक्षित गुंतवणूक करण्याला प्राधान्य देतात कारण ते कमी जोखमीचे असते जर तुम्हीही कमी जोखमीचे पर्याय शोधत असाल तर पोस्ट ऑफिसची (Post office) नवी स्कीम तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
पोस्टाच्या अनेक बचत योजनांना ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. तुम्ही दरदिवशी ५० रुपये जमा करून ३५ लाख रुपयांचा निधी उभारू शकता. या योजनेतील गुंतवणूक दरमहा १५०० रुपये इतकी असणार आहे. या योजनेचे नाव पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना असे आहे. जाणून घ्या कसे मिळणार तुम्हाला ३५ लाख रुपये.
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना
ही एकप्रकारची विमा योजना आहे. वय वर्ष १९ ते ५५ वर्षापर्यंतचा कोणताही भारतीय नागरिक या योजनेचा फायदा घेऊ शकतो. या योजनेतील किमान विमा रक्कम १० हजार रुपये आहे. त्याशिवाय, अधिकाधिक विमा रक्कम १० लाख रुपये आहे. या योजनेतील प्रीमियम दरमहा, तिमाही, सहामाही आणि वार्षिक पद्धतीने भरता येऊ शकते. प्रीमियम भरणावर ३० दिवसांची सवलतही मिळू शकते.
३१ ते ३५ लाखापर्यंतचा फायदा
या योजनेत ३१ ते ३५ लाख रुपयांपर्यंतचा फायदा मिळू शकतो. या योजनेनुसार, तुम्ही कर्जही घेऊ शकता. त्याशिवाय जीवन विम्याचा फायदाही मिळू शकतो. मात्र, तुम्हाला ही पॉलिसी खरेदी केल्यानंतर चार वर्षानंतरच कर्ज मिळू शकते.
३५ लाख कसे मिळणार?
या योजनेत तुम्ही १९ व्या वर्षापासून गुंतवणूक करण्यास सुरुवात करत असल्यास आणि १० लाखांची पॉलिसी खरेदी करत असाल तर तुम्हाला ३५ वर्षांसाठी दरमहा १५१५ रुपये आणि ५८ वर्षांसाठी १४६३ रुपये आणि ६० वर्षांसाठी १४११ रुपये प्रीमियम भरावा लागणार आहे.
५५ वर्षासाठी ३१.६० लाख रुपयांचा मॅच्युरिटी बेनिफिट मिळणार
५८ वर्षासाठी ३३.४० लाख रुपयांचा मॅच्युरिटी बेनिफिट मिळणार
६० वर्षासाठी ३४.६० लाख रुपयांचा मॅच्युरिटी बेनिफिट मिळणार
त्याशिवाय, ग्राहक तीन वर्षानंतर ही पॉलिसी सरेंडर करू शकतात. ही पॉलिसी इंडिया पोस्टमधून ग्राहक घेऊ शकतात. ग्राहकांना बोनस सुविधादेखील आहे. ग्राहकांना ६५ रुपये प्रति १००० रुपयांचे आश्वासन दिले.