नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी पूर्वांचल एक्स्प्रेस-वेचे उद्घाटन कार्यक्रमांतील एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामध्ये मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांना त्यांच्या सुरक्षारकाने रोखलं. हा व्हिडीओ काँग्रेसने शेअर करत मुख्यमंत्र्यांना अशी वागणूक देणे योग्य आहे का? असा सवाल केला आहे.
झालं असं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी भोपाळमध्ये आले होते. राज्यपाल मंगूभाई पटेल, मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यासहित अन्य नेते त्यांच्या स्वागतासाठी हजर होते. दरम्यान यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रदर्शन पाहत असतानाचा एक व्हिडीओ काँग्रेसने शेअर करत प्रश्न विचारला आहे. काँग्रेसने केलेल्या दाव्यानुसार, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत चालत असलेल्या शिवराज सिंग चौहान यांना त्यांच्या सुरक्षारकाने रोखलं. मध्य प्रदेश काँग्रेसने व्हिडीओ ट्वीट करत मुख्यमंत्र्यांना अशी वागणूक देणं योग्य आहे का ? अशी विचारणा केली आहे. यानंतर अनेक काँग्रेस नेत्यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे.
काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनीदेखील हा व्हिडीओ ट्वीट करत म्हटलं आहे की, “हे राम…मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांचा त्यांच्याच राज्यात असा अपमान? मोदींनी आधीच आपल्या सुरक्षारक्षकाला हे सर्व करण्यासाठी सांगितलं असणार, अन्यथा कोणी मुख्यमंत्र्यांना कसं काय रोखू शकतं? याआधी जे पी नड्डांसोबत अमित शाह यांनी असंच केलं होतं”.