जळगाव (प्रतिनिधी) जळगाव महानगरपालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. मात्र, पहिल्यांदाच जळगाव महानगरपालिकेवर शिवसेनेची एकहाती सत्ता स्थापन झाली आहे. भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांचे जळगाव महानगरपालिकेवर वर्चस्व आहे. मात्र, तरीदेखील शिवसेना भाजपचे नगरसेवक फोडण्यात यशस्वी झाली. हा करेक्ट कार्यक्रम कसा शक्य झाला, यावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी भाष्य केले आहे. केवळ १० दिवसांत हे सगळं झालं. याबाबत कुणाला जास्त माहिती नव्हती, असे एकनाथराव खडसे यांनी सांगितले.
जळगाव महानगर पालिकेमध्ये सत्ताधारी भाजपाला पराभवाचा धक्का देत शिवसेनेनं भगवा फडकावला आहे. हा भाजपासोबतच जळगावमध्ये ज्यांचं प्रस्थ मानलं जातं, ते भाजपाचे संकटमोचक गिरीश महाजन यांचं मोठं अपयश म्हटलं जात आहे. जळगाव महानगरपालिकेत शिवसेनेची एकहाती सत्ता आली आहे. याबाबत फारसं कुणाला माहिती नव्हतं. गेल्या १० दिवसांत सूत्र हलवली. कामे होत नसल्यामुळे आणि भ्रष्टाचार वाढल्यामुळे सगळे नगरसेवक आणि जनता नाराज होती. त्यामुळे आमच्याकडे येण्यासाठी नगरसेवकांना फारसा आग्रह करावाच लागला नाही, असे खडसे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घेतली भेट
दरम्यान, जळगाव महानगरपालिका निवडणुकीविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या चर्चेविषयी देखील एकनाथ खडसेंनी सांगितलं. “१० दिवसांपूर्वी याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा झाली. मी त्यांना सांगितलं की तुम्ही महापौरपदासाठी तुमचा उमेदवार दिला, तर मी मदत करू शकेन. नुसतं आवाहन केलं, तर नगरसेवक जमू शकतात. त्यानंतर एकनाथ शिंदे, विनायक राऊत यांच्यासोबत चर्चा झाली. त्यानंतर नाराज नगरसेवकांना फार आग्रह करण्याची गरजच पडली नाही. यातले बरेच नगरसेवक मला आधी भेटूनही गेले होते. त्यानंतर हा सगळा प्लॅन ठरला. आमच्याकडे आलेले २२ होते, शिवसेनेचे १५ होते आणि एमआयएमचे ३ आमच्याकडे आलेच होते”, असं खडसेंनी सांगितलं.