अमळनेर (प्रतिनिधी) आठ वर्षांपूर्वी अमळनेरात झालेल्या खुनाचा उलगडा झाला आहे. दारूच्या नशेत खून केल्याची बडबड सुरत मध्ये केल्याने अमळनेर पोलिसांनी धुळे तालुक्यातील कुसुम्बा येथील वाल्मिक चौधरी याला ताब्यात घेतले आहे.
यासंदर्भात अधिक असे की, दि. १८ मे २०१४ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास तत्कालीन पोलीस निरीक्षक अनिल देशमुख याना एक अनोळखी प्रेत मंगळ मंदिराजवळ पडलेले असल्याची माहिती मिळाली होती. मयत व्यक्ती ३५ वर्षीय अनोळखी असून त्याच्या उजव्या हातावर लता लव असे लिहिलेले होते. पोलिसांनी तपास केल्यानंतरही मयत व्यक्ती व मारणारा यांची ओळख पटलेली नव्हती. सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करून नंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पंधरा दिवसांपूर्वी वाल्मिकने दारूच्या नशेत सुरत येथे खून केल्याची बडबड केली अन् सुरत पोलिसांनी त्याच्या वक्तव्याची खात्री करण्यासाठी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्याशी संपर्क साधत खात्री केली. एक व्यक्ती २०१४ मध्ये मयत आढळली होती. त्यावरून पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी एपीआय राकेशसिंग परदेशी, पोलीस नाईक डॉ. शरद पाटील, रवी पाटील, दीपक माळी, सिद्धांत शिसोदे यांच्या पथकाला पाठवून सुरत येथून आरोपीला ताब्यात घेतले आहे.
असा केला खून
मूळचा कुसुंबा येथील असलेला वाल्मिक रमेश चौधरी हा आपल्या आईसोबत पांडेसरा सुरत भागात राहत होता. त्याच भागात उत्तरप्रदेशातील अशोक यादव नावाची व्यक्ती राहत होती. अनैतिक संबंधांवरून अशोक यादव हा वाल्मिक चौधरीची आई लताबाई हिला त्रास देऊ लागला होता. ही बाब वाल्मिकला खटकत होती. अशोकने आपले मित्र पिंटू आणि भैय्या यांना पाच हजार रुपये देऊन अशोकला धमकवण्याचा प्लॅन केला. वाल्मिकने अशोकशी मैत्री केली आणि दोन्ही मित्रांच्या मदतीने त्याला दारू पाजत पाजत सुरत येथून अमळनेर आणले. अमळनेर आल्यावर मंगळ ग्रह मंदिराच्या लघुसिंचन नाल्याच्या पूर्वस २०० मीटर अंतरावर अशोकशी वाल्मिकची बाचाबाची झाली आणि त्यातून त्याने दोन तीन दगडाने अशोकचा चेहराच ठेचून त्याचा खून केला.