वरणगाव, ता. भुसावळ (प्रतिनिधी) वीज पडून शेतात काम करणाऱ्या दोन महिलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सुसरी येथे मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. ममता विनोद पाटील (वय ३०) व मीनाक्षी रवींद्र तळेले (वय २८), असे मयत महिलांची नावं आहेत.
भुसावळ तालुक्यातील सुसरी येथील रवींद्र तळेले हे मंगळवारी आपल्या पत्नीसह इतर दोन महिलांना शेती कामासाठी शेतात घेवून गेले होते. दुपारी एक वाजेच्या सुमारास वरणगाव व परिसरात विजांचा कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे ममता पाटील व मीनाक्षी तळेले या महिला शेतातील कडुनिंबाच्या झाडाखाली आसरा घेण्यासाठी गेल्या.
याच वेळी अचानक वीज कोसळल्याने या दोघांचा जागीच मृत्यू झाला. हि माहिती कळताच ग्रामस्थांनी दोन्ही महिलांना ट्रॅक्टरद्वारे वरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणले. याबाबत सुसरी गावचे पोलीस पाटील नितीन पुंडलीक पाटील यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शेतात काम करताना वीज कोसळून मयत झालेल्या अनिता विनोद पाटील यांना नीलेश (वय ७) व रुद्रा ( वय अडीच वर्षे) तर मीनाक्षी रवींद्र तळेले यांना राशी (वय १९) व पाथर्व अशी दोन मुले आहेत. या घटनेमुळे या चारही अल्पवयीन मुलांचे मातृछत्र हरपल्याने सुसरी गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
विजांचा कडकडाट व पाऊस सुरु होण्यापूर्वी रवींद्र तळेले हे देखील शेतात काम करत होते. मात्र, शेतालगतच्या शेतकऱ्याने गवताचे ओझे उचलून देण्यासाठी त्यांना हाक दिल्याने ते त्यांच्याकडे गेले होते. तर दुसरी महिला वत्सला आनंदा तळेले (वय ५५) या देखील लगतच्या शेतात विजांचा कडकडाट व पाऊस सुरु झाल्याने तिकडेच थांबल्याने हे दोघेही थोडक्यात बचावले.