छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) बेगमपुरा येथील लाल मंडीत राहणाऱ्या एका व्यक्तीचा बुधवारी मकाई गेट पुलाखाली संशयास्पदरीत्या मृतदेह आढळला होता. पोलीस तपासात हा खून सख्ख्या बहिणीनेच मारेकऱ्यांना सुपारी देऊन केला असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. जगदीश ज्योतिष फत्तेलष्कर (वय ४०, रा. मनपा शाळेसमोर, बेगमपुरा), असे मृताचे तर रिना राजेश यादव, रितेश रामलाल मंडले ऊर्फ यादव, रमाबाई रामलाल मंडले, लखन, गोलू आणि इतरांचा आरोपींमध्ये समावेश आहे.
मयताची पत्नी किरण जगदीश फत्तेलष्कर (वय ३७) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार किराणा चावडीत असणाऱ्या दुकानात काम करणारे जगदीश दोन मुले, पत्नी, आई, वडील, भाऊ व भावजयीसह राहत होते. आठ महिन्यांपूर्वी जगदीश यांच्या मुलीचे लग्न झाले. तेव्हा पैशांची गरज पडल्याने त्यांनी रिनाकडून ३ लाख रुपये घेतले होते. तेव्हा मदत म्हणून दिलेले पैसे रिनाने ३० टक्के व्याजासह परत मागितले. जगदीश पैशांसाठी प्रयत्न करत होते. मात्र, रिना हिने सासरकडील नात्यातीलच तरुण रितेश मंडले, रामलाल मंडले उर्फ यादव, त्याची आई रमा यांच्या मदतीने धमकावणे सुरू केले. ३१ ऑक्टोबर रोजी तिघांनी काही गुंडांसह त्यांच्या घरी जाऊन शिवीगाळ केली.
दि. १ रोजी पुन्हा दुपारी त्यांनी जगदीश यांचे घर गाठले. रितेश याने अचानक त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. आईलाही डोळ्यात तिखट टाकून मारण्याची धमकी दिली. त्यानंतर सोबत वसुलीसाठी आलेल्या गुंडांनी जगदीश यांना बळजबरीने कारमध्ये नेले. प्रथमदर्शनी जगदीश यांची आत्महत्येचा अंदाज होता. मात्र, रीना त्यांच्या अंत्यसंस्कारालाही अनुपस्थित राहिली व हत्येची दाट शक्यता निर्माण झाली. त्यानंतर बेगमपुरा पोलिसांचे पथक अकोटच्या दिशेने रवाना झाले होते.
रीनाचे सासर अकोला तालुक्यातील अकोट येथील आहे. परंतु, कुटुंबासह ती बेगमपुयातच वास्तव्यास होती. रीनाने भावाला पैशांच्या बदल्यात २६०० स्केअर फुटाचे जुने घर नावावर करून देण्याचा तगादा लावला होता. ते मिळवण्यासाठी रितेशने अकोटवरून गुंड आणले. १ नोव्हेंबर रोजी जगदीश यांची पत्नी, मुले रीनाला रजिस्ट्री होईपर्यंत थांबण्यासाठी विनवण्या करत होती. मात्र, रीनाला दया आली नाही.
शुक्रवारी चार संशयितांना पोलिसांनी पकडले होते. आतापर्यंत ११ संशयितांना ताब्यात घेण्यात आले. पुढील तपास उपायुक्त नितीन बगाटे, सहायक आयुक्त संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बेगमपुऱ्याच्या निरीक्षक आम्रपाली तायडे, सहायक निरीक्षक हरेश्वर घुगे याप्रकरणी तपास करत आहेत.