हिंगोली (वृत्तसंस्था) हिंगोलीत लग्नासाठी मुलगी देत नसल्याने तिच्यासोबतच तिघांनाही पळवण्यात आल्याचा प्रकार पोलिसांच्या चौकशीत स्पष्ट झाला आहे. शहर पोलिसांनी या प्रकरणात एका तरुणाला मंगळवारी (१८ एप्रिल) अटक केली.
हिंगोली शहरातील मस्तानशहानगर भागातील एका विवाहित महिलेसह तिची अडीच वर्षांची मुलगी व इतर दोन अल्पवयीन मुली १३ एप्रिलला सकाळी आठ वाजता कामासाठी अंधारवाड़ी शिवारात गेल्या होत्या. सायंकाळी उशिरापर्यंत त्या आल्या नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला होता. मात्र त्या सापडल्या नाहीत. या प्रकरणात सलमान नावाच्या तरुणाविरुद्ध हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पोलिसांचे पथक मुंबईला येणार असल्याचे समजताच आरोपीने त्या अल्पवयीन मुलीसह मंगळवारी हिंगोली गाठले.
हिंगोलीत परतलेल्या मुलींकडून पोलिसांनी मिळवलेल्या माहितीनुसार, आरोपीने चारही मुलींना मुंबईला नेले होते. आरोपीचे अल्पवयीन मुलीवर प्रेम होते. परंतू मुलगी सोबत येत नसल्यामुळे तिच्यासह इतर तिघी म्हणजेच विवाहित महिला, तिची अडीच वर्षांची मुलगी व आणखी एक अल्पवयीन मुलगी, असे तिघींना आरोपीने पळवले. सलमान असे आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने मुलीस लग्नाचे अमिष दाखविले मात्र मुलगी सोबत जात नसल्याने आम्हालाही पळवण्यात आल्याचे त्यांनी प्राथमिक चौकशीत सांगितले.