जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील आसोदा बसस्थानकाजवळ बोलण्यासाठी दिलेला मोबाईल फोडल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून तरूणाला दोन जणांनी शिवीगाळ करत चाकूने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना सोमवारी ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी मंगळवारी ६ ऑगस्ट रोजी मध्यरात्री अडीच वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश उर्फ अमोल सोमा सपकाळे (वय २५ रा. आसोदा ता.जळगाव), हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोमवारी ५ ऑगस्ट रोजी आसोदा बसस्थानकाजवळ योगेश सपकाळे हा उभा होता. त्यावेळी गावातील कुणाल उर्फ दुंड्या (पुर्ण नाव माहित नाही) आणि जयेश विलास कोळी दोन्ही रा. आसोदा हे योगेशजवळ आले. यातील कुणालने योगेशचा मोबाईल बोलण्यासाठी मागितला. त्यानुसार मोबाईल बोलण्यासाठी दिला, बोलणे झाल्यानंतर योगेशने त्याचा मोबाईल परत मागितला. या रागातून कुणालने त्याचा मोबाईल जमिनीवर आपटून फोडला. त्यावर मोबाईल भरून देण्याचे सांगितल्याने दोघांनी योगेशला शिवीगाळ करून चाकूने वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी मंगळवारी ६ ऑगस्ट रोजी मध्यरात्री अडीच वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात कुणाल उर्फ दुंड्या (पुर्ण नाव माहित नाही) आणि जयेश विलास कोळी दोन्ही रा. आसोदा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ दिनेश चव्हाण हे करीत आहे.