जळगाव (प्रतिनिधी) पाणी भरण्यासाठी २१ वर्षीय महिला घरी आलेली असताना तिला धमकी देत तिच्यावर अत्याचार करण्यात आला. ही घटना दि. १७ सप्टेंबर रोजी रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका परिसरात घडली. या प्रकरणी दि. ३० सप्टेंबर रोजी रामानंद नगर पोलिस ठाण्यात सुभाष चव्हाण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गिरणा पंपिंग रस्त्यावरील एका परिसरात मध्यप्रदेशातील एक कुटुंब वास्तव्याला आले आहे. या कुटुंबातील महिलेला त्याच परिसरात राहणाऱ्या सुभाष चव्हाण याच्या पत्नीने पाणी भरून ठेवण्याविषयी सांगितले होते. त्यानुसार ही महिला चव्हाण यांच्या घरी पाणी भरण्यासाठी गेली होती. यावेळी सुभाष चव्हाण हा घरात आला याने दरवाजा बंद करीत महिलेशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. महिलेने प्रतिकार केला असता तिला धमकावत तिच्यावर अत्याचार केला. महिलेने आरडाओरड केल्यानंतर तिचा पती तेथे गेला असता चव्हाण तेथून पळून गेला. या प्रकरणी महिलेने दि. ३० सप्टेंबर रोजी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सुभाष चव्हाण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि कैलास दामोदर करीत आहेत.