जळगाव (प्रतिनिधी) लग्नाचे आमिष दाखवून 15 वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेत 22 महिने डांबुन ठेवत अत्याचार केल्या प्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात आज (बुधवार) न्यायालयाने आरोपीस दोषी धरुन 20 वर्षे सश्रम कारावास व 74 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली. गोलू रामसिंग राठोड (वय 24, रा. धनवाडा, ता. खिडकीया, जि. हरदा, मध्यप्रदेश. हल्ली रा. समतानगर, जळगाव) असे आरोपीचे नाव आहे.
गोलू राठोड याने 16 डिसेंबर 2019 रोजी शहरातील एका 15 वर्षीय तरुणीस लग्नाचे आमीष दाखवून पळवून नेत तीला हरदा, बुरहाणपुर, खिडकीय अशा वेगवेगळ्या ठिकाणांवर तब्बल 22 महिने डांबून ठेवले होते. गोलूने पिडीतेसोबत लग्न न करता तिला जीवेठार मारण्याची धमकी देऊन तीच्यावर अत्याचार केले. या प्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी राठोडला सन 2021 मध्ये अटक केली. दोषारोप न्यायालयात दाखल झाल्यानंतर या गुन्ह्याचा खटला जिल्हा सत्र न्यायालयातील विशेष पोक्सो न्यायाधिश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधिश बी. एस. महाजन यांच्या न्यायालयात चालवण्यात आला.
या गुन्ह्यात सरकारपक्षाने एकुण 11 साक्षिदार तपासले. यात अल्पवयीन मुलगी आणि वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. साक्ष, पुरव्याअंती न्यायालयाने राठोड याला दोषी धरुन शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे ॲड. चारूलता बोरसे यांनी प्रभावी युक्तीवाद केला. ॲड. शारदा सोनवणे व पैरवी अधिकारी विजय पाटील यांनी सहकार्य केले.