जळगाव, (प्रतिनिधी) शहराच्या सर्वांगिण विकासाचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अधिकृत उमेदवार जयश्री महाजन यांनी प्रभाग क्रमांक १४ मधील प्रचाराची प्रभावी सुरुवात केली. विठ्ठल रखुमाई मंदिरात दर्शन घेऊन त्यांनी आपल्या मोहिमेला शुभारंभ केला. या प्रसंगी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जयश्री महाजन यांनी जळगाव शहरातील विविध समस्या, अपूर्ण विकासकामे आणि नागरिकांच्या अपेक्षांवर संवाद साधला.
जयश्री महाजन यांच्या प्रचार मोहिमेदरम्यान नागरिकांनी जळगावच्या अपूर्ण विकासाबाबत असंतोष व्यक्त केला. पाणीपुरवठ्याच्या समस्यांपासून रस्त्यांच्या दुरावस्थेपर्यंत, पायाभूत सुविधांच्या उणीवांबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अनेक नागरिकांनी विद्यमान आमदारांवर आरोप करत सांगितले की, “गेल्या काही वर्षांत आमच्यासाठी फक्त आश्वासने मिळाली, प्रत्यक्षात कोणताही बदल झाला नाही. केवळ कोटीच्या कोटी निधीची घोषणा झाली. पण प्रत्यक्षात शहर विकास दिसत नाही.” या पार्श्वभूमीवर, “मात्र यावेळी आम्ही तुम्हालाच मतदान करणार,” असे ठामपणे सांगत नागरिकांनी जयश्री महाजन यांच्यावर विश्वास दाखविला.
नागरिकांशी संवाद साधताना जयश्री महाजन यांनी सांगितले, “आपल्या शहराचा विकास थांबला आहे, अंधार कायम आहे, दूर करण्यासाठी, आपल्या मुलांना इथेच रोजगार मिळणे तर दूर पण मोठ्यामोठ्या कंपन्यांमधील स्थानिकांना नोकरीवरून काढले जात आहे. शहराच्या सर्वांगिण विकासासाठी आणि पुन्हा जळगाव सुवर्णनगरी म्हणून जगासमोर येण्यासाठी मशाल या चिन्हासमोरील बटण दाबा. भूतकाळातील चुका टाळा आणि आम्हांला एक संधी द्या. एक संधी मिळाल्यास जळगावच्या प्रत्येक प्रभागात विकासाचा प्रकाश पोहोचवू. तुमचा विश्वास आणि साथ हीच आमची ताकद आहे. आम्ही जळगावला सुवर्णनगरी बनवण्यासाठी कटिबद्ध आहोत. एकदा संधी दिल्यास तुमच्या समस्या सोडवण्याचे वचन देते.”जयश्री महाजन यांच्या या भावनिक आवाहनाला नागरिकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांच्या सभेत उत्साही नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
जयश्री महाजन यांच्या प्रचार दौऱ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनेक वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, महिला आघाडी महानगर प्रमुख मनीषा पाटील, उपमहानगरप्रमुख निता सांगोळे, मंगला पाटील, जया तिवारी आणि इतर प्रमुख नेत्यांचा समावेश होता.
जयश्री महाजन यांच्या प्रचार दौऱ्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांच्या आजच्या प्रचार दौऱ्यातील उत्स्फूर्त गर्दीवरून स्पष्ट होतो. जयश्री महाजन यांच्या प्रचाराचा मुख्य उद्देश नागरिकांच्या थेट समस्या ऐकून त्या सोडवण्यासाठी उपाययोजना करण्यावर आधारित आहे. त्यांच्या मोहिमेत महिलांचा सहभाग विशेषत्वाने दिसून आला. यावेळी पत्रकारांशी बोलतांना जयश्रीताईंच्या रूपाने आम्हाला एक प्रामाणिक आणि विकासाभिमुख नेतृत्व मिळाले असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.
यावेळी जयश्री महाजन यांच्या नेतृत्वाखाली जळगावच्या विकासाचा नवा अध्याय सुरू होण्याची आशा जळगावकरांनी व्यक्त केली. जयश्री महाजन यांच्या प्रचार दौऱ्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, जळगावच्या आगामी निवडणुक चुरशीची व तुल्यबळ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.