सावदा (प्रतिनिधी) आदल्या दिवशी कुटुंबियांसह गावातील सगळ्या मित्रांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि दुसऱ्या दिवशी त्याच तरुणाचा अचानक मृत्यू झाल्याची मन सुन्न करणारी घटना जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सावदा जवळील कोचूर गावात घडली. हर्षल पाटील (वय ३१), असे मयत तरुणाचे नाव आहे. हर्षल हा घरातील दोन बहिणींचा एकुलता एक भाऊ होता.
२० जुलैला हर्षलचा वाढदिवस होता. यामुळे मित्रपरिवाराने त्याला भरभरून शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावर स्टेटस ठेवले. वाढदिवस असल्याने हर्षलही मोठ्या आनंदात होता. दिवसभर मित्रांकडून शुभेच्छांचा स्वीकार केला. आई-वडिलांसह दोन बहिणींनी देखील त्याला दीर्घआयुष्याचा आशीर्वाद दिला. पण नियतीच्या मनात काही वेगळचं होतं. कारण, २० तारखेला वाढदिवस साजरा केल्यानंतर २१ जुलैला सकाळी ९ वाजेच्या सुमारास हर्षलच्या पोटात अचानक दुखू लागले. त्यामुळे त्याला तातडीने फैजपूर येथील एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. पण, डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी जळगावला पाठवले.
जळगाव येथे उपचार सुरू असताना सायंकाळी हर्षलचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची बातमी धडकताच गावात सर्वांना धक्का बसला. त्यामुळे सोशल मिडीयावर हर्षलच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांऐवजी श्रद्धांजलीचे संदेश सुरू झाले. हर्षल हा घरातील दोन बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. सायंकाळी ७ वाजता अतिशय शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यविधी झाले. दरम्यान, यावेळी दोघं बहिणींसह कुटुंबियांनी काळीज चिरणारा आक्रोश केला होता.