जळगाव (प्रतिनिधी) शहरातील महामार्गाची दुरवस्था, खड्डे, तकलादू दुरूस्ती, ढसाळ दुभाजक, गैरसोयीचे वर्तुळाकार वाहतूक बेट, जीवघेणे गतीरोधक अशा अनंत विघ्नांचे हरण गणरायाने करावे असा संकल्प जळगाव नागरिक मंचचे केला आहे. यावर्षी गणेशोत्सवाला शनिवार, दि. ७ सप्टेंबर पासून प्रारंभ होत आहे. यानिमित्ताने जळगाव नागरिक मंच १० दिवस महामार्गावरील विघ्नहरण जागृती करणार आहे.
जळगाव येथील जनरल अरूण कुमार वैद्य चौकातील (आकाशवाणीजवळ) रोटरी सर्कलमध्ये रोज गणेश पूजन, आरती आणि भजनांचा कार्यक्रम होणार आहे. या सर्कलमध्ये एका मंडपात सायंकाळी एक तास शहरातील मान्यवरांच्या हस्ते गणेश पूजन, त्यानंतर आरती आणि तासभर भजनांचा कार्यक्रम होईल. गणेश पूजन मंडप आणि रोटरी सर्कल भोवती सुरक्षित वाहतुकीशी संबंधित माहितीचे फलक असतील. गणेश पूजन चल स्वरूपातील मूर्तीचे केले जाईल. पूजन, आरती व भजन या काळापर्यंत मूर्ती मंडपात असेल. या सोबतच नागरिकांच्या माहितीसाठी सुरक्षित वाहतूक संबंधित प्रचार पत्रके वाटली जातील. गणेश पूजनाचे हे नियोजन गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे यांनी सूचविले आहे.
गणेश पूजन व आरतीनंतर एक तास भजनांचा कार्यक्रम होईल. यात जळगाव शहरातील १० भजन मंडळांची निवड करायची आहे. शहराच्या कोणत्याही भागातील महिला – पुरूष वा महाविद्यालयीन तरूण – तरुणींचे भजन मंडळ येथे सादरीकरण करू शकते. यासाठी मोबाईल क्रमांक ७७७३९२२१६६ वर संपर्क करावा. केवळ १० मंडळांना संधी मिळेल हे लक्षात घेऊन त्वरित संपर्क करावा.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार
जळगाव नागरिक मंचचे बैठक काल झाली. महामार्गाची दुरवस्था आणि सतत होणाऱ्या अपघातात जाणारे नागरिकांचे बळी या विषयावर राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण सोबत एकत्रित बैठक घ्यावी ही मागणी निवेदनात केली जाणार आहे. रामविप्रा प्रकल्पाच्या जळगाव कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संवाद होऊन त्यांची अडचण काय किंवा दुर्लक्षाची कारणे जाणून उपाययोजनांचे नियोजन हाच बैठकीचा हेतू असेल. जळगाव महापालिकेकडे हा जुना महामार्ग हस्तांतर करण्याच्या अगोदर त्याची पूर्णतः दुरूस्ती व्हावी हा मंचचा प्रयत्न आहे.