जळगाव, ( प्रतिनिधी ) दि. 26 जानेवारी 2026 – राज्य शासनाच्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांचे अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) यांच्यामार्फत करण्यात आले. प्रजासत्ताक दिनानिमित्त जाहीर झालेल्या या निकालानंतर मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.*
कार्यालयाची अधिकृत संकेतस्थळ व्यवस्था, ‘आपले सरकार’ प्रणाली, ई-ऑफीस प्रणाली, कार्यालयीन डॅशबोर्ड, व्हॉट्सॲप चॅटबॉट, शासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर तसेच GIS तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग – या सात निकषांवर जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल मुख्यमंत्री कार्यालयाकडून जिल्हाधिकारी रोहन घुगे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाचे अभिनंदन करण्यात आले असून, लवकरच राज्य शासनातर्फे सर्व विजेत्या कार्यालयांचा औपचारिक गौरव करण्यात येणार आहे.















