जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा सामान्य रुग्णालयात (Ventilator) व्हेंटिलेटर खरेदी प्रकरणात गैरव्यवहाराचा आरोप जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.नागोराव चव्हाण (Dr. Nagarao Chavan) यांच्यावर करण्यात आला होता. त्यामुळे प्रशासकीय कारणास्तव डॉ. नागोराव चव्हाण यांची वैद्यकीय अधिकारी म्हणून रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता डॉ. किरण पाटील वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय, धरणगाव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोरोना काळात व्हेंटिलेटर व इतर वस्तू खरेदीत घोटाळा झाल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी केली असून जिल्हापेठ पोलीस स्थानकात देखील तक्रार दाखल केली आहे. या संदर्भात वरिष्ठ पातळीवर चौकशी सुरू असल्याने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांची बदली झाल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्हा सामान्य रुग्णालयात व्हेंटिलेटर खरेदी प्रकरणात गैरव्यवहाराचा आरोप जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. नागोराव चव्हाण यांच्यावर करण्यात आला होता. याप्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य शासनाकडे पाठविला होता. तसेच त्यांच्याबाबत तक्रारदारांनी शासनाकडे तक्रारी देखील केल्या होत्या. या सर्व बाबींची दखल घेत शासनाने प्रशासकीय कारण दाखवित डॉ. चव्हाण यांची उचलबांगडी केली आहे. तसेच त्यांच्या जागी डॉ. किरण पाटील यांची वर्णी लागली आहे.