जळगाव (प्रतिनिधी) शहराजवळ गिरणा नदीवर असलेल्या कांताई बंधाऱ्यावर शिवाजी नगर परिसरातील मुलांनी रविवारची ट्रीप काढली होती. यावेळी अचानक एका मुलीचा पाय घसरल्यामुळे ती पाण्यात पडली. एकमेकाला वाचविण्याच्या प्रयत्नात चार मुलं पाण्यात वाहून जात होती. त्यातील तिघांना वाचविण्यात यश आले तर, एकाचा शोध सुरु आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवाजी नगर परिसरातील दुध फेडरेशन जवळ मिथिला अपार्टमेंटमधील १० ते १५ मुलांनी कांताई बंधारा नागाई- जोगाई मंदिर परिसरात रविवारची ट्रीप काढली होती. यावेळी अचानक एका मुलीचा पाय घसरल्यामुळे ती पाण्यात पडली. एकमेकाला वाचविण्याच्या प्रयत्नात चार मुलं पाण्यात वाहून जात होती. त्यातील तिघांना वाचविण्यात यश आले असून एकाचा शोध सुरु आहे. समिक्षा विपीन शिरडुकर (वय १७), योगिता दामू पाटील (वय २०) आणि सागर दामू पाटील (वय २४) या तिघांना जिल्हा रुग्णालयात आणण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. तर नयन योगेश निंबाळकर (वय १४) याचा शोध अद्याप सुरु आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा रुग्णालयात नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे. वाचविण्यात यश आलेल्या तिघं मुलांना खाजगी रुग्णालयात नेण्यात आल्याची देखील माहिती मिळत आहे. दरम्यान, दुपारी झालेल्या मुसळधार पावसानंतर नागाई- जोगाई मंदिर परिसरात असलेल्या गिरणा नदीच्या पात्राच्या पाण्यात वाढ झाली. त्यामुळे या मुलांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.