जळगाव (प्रतिनिधी) राजकारण आणि सेक्स स्कॅन्डलच्या नावाने जळगाव कधीकाळी देशभरात बदनाम झाला होता. राष्ट्रवादीच्या अभिषेक पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकविण्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा प्रकार समोर आल्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा प्रचंड खळबळ उडालेली आहे. कारण संबंधित महिलेने अनेक राजकीय पुढाऱ्यांना आपण मुली पुरवीत असल्याचे म्हटल्यामुळे जिल्ह्यात अशा पद्धतीचे हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालत असतांना पोलिसांना याची खबर कशी लागली नाही?, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. त्यामुळे आता सेक्स रॅकेटच्या दृष्टीने पोलीस तपासाची गरज निर्माण झाली आहे. तर संबंधित महिलेचे म्हणणं खोटं असेल तर जळगावची बदनामी होत असतांना सर्व पक्षीय पुढारी गप्प का?, असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे.
मागील वर्षी भाजपच्या एका नेत्याचे अश्लील फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर राजकारणात भूकंप आला होता. त्यानंतर आता काही दिवसांपूर्वी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी एका माजी मंत्र्यांच्या पीएच्या अश्लील व्हिडीओ क्लिपबाबत वक्तव्य करत काही दिवसांपूर्वी खळबळ उडवून दिली होती. तत्पूर्वी काही वर्षांपूर्वी जळगाव जिल्ह्यावर सेक्स स्कँडल प्रकरणाने मोठा काळा डाग लागला होता. देशभरात या प्रकरणामुळे जिल्ह्याची मोठी बदनामी झाली होती. त्यातून जिल्हा आता बऱ्यापैकी सावरला होता. तर गेल्या वर्षभरापासून शहरात एक दोन ठिकाणीं कुंटणखाना चालविण्याचे प्रकार पोलीसांच्या लक्षांत आल्यावर त्यांनी ते लगेच उधळून लावले. मात्र नुकतेच अभिषेक पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकविण्याचा प्रकार समोर आल्याने पुन्हा एकदा प्रचंड खळबळ उडाली आहे.
अभिषेक पाटील आणि संबंधित महिलेत झालेल्या संवादात उघडपणे आपण जळगावमधील पुढाऱ्यांना मुली पुरवीत असल्याचे म्हणतेय. त्यामुळे जिल्ह्यात पूर्वी घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती झाली नाहीय ना?, अशी भीती जिल्हावासीयांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. खरं तर या प्रकरणी एकटे अभिषेक पाटील यांना बदनाम करण्याचे षडयंत्र नाही. तर त्या महिलेने जिल्ह्यातील सर्वच राजकीय पुढाऱ्यांच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. तर सर्वसामान्य जनतेच्या मनात देखील संशयाची सुई निर्माण झाली आहे. संबंधित महिला अनेक दिवसांपासून आपण हा उद्योग करत असल्याचे देखील संभाषणात म्हणतेय. त्यामुळे हे सेक्स रॅकेट किती दिवसापासून सुरु आहे?, यात कोण-कोणत्या मुलींना गोवण्यात आलेय. या मुली गरिब घरातील आहेत का..?. तसेच ते वासनांध पुढारी कोण? याचा तपास लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर येऊन ठेपले आहे. तर जर ही महिला खोटं बोलत असेल तर या मागचे राजकारण काय? याचा तपास देखील पोलिसांना लावावा लागणार आहे.
दुसरीकडे जळगाव शहरालगत मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात लॉजेस सुरु झाल्या आहेत. याठिकाणी वैशाव्यवसाय चालत असल्याची ओरड नेहमीच आहे. परंतू आता एका महिलेने थेट आपण राजकीय लोकांना मुली पुरवीत असल्याचे सांगितल्यामुळे या प्रकरणाचा तपास होणे गरजेचे आहे. कारण या सेक्स रॅकेटमध्ये गरीब घरातील मुलींना गोवल्याची शक्यता नाकारता येत नाही. तर दुसरीकडे अशा पद्धतीने मुली पुरविण्याचे बोलून काही पुढाऱ्यांना हा सूचक इशारा तर नाहीय ना?,असा देखील प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.