जळगाव (प्रतिनिधी) महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदांसाठी १८ मार्च रोजी घेण्यात येणारी निवड प्रक्रिया ऑनलाईन नव्हे तर ऑफलाईन या प्रकारात घेण्यात यावी या मागणीसाठी भाजपच्या दोन नगरसेवकांनी खंडपिठात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी आज औरंगाबाद खंडपीठाने ही निवडणूक ऑनलाईन पद्धतीने घेण्यात यावी, असा निर्णय दिला आहे.
जळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौर निवड १८ मार्च रोजी होत आहे. दुसरीकडे भाजपचे अनेक नगरसेवक फुटले आहेत. तशात निवड प्रक्रिया ऑनलाईन या प्रकारात होत असल्याने भाजपने याला विरोध दर्शवित डॉ. विरन सुरेश खडके व रंजना विजय सोनार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. भाजपच्या दोन्ही नगरसेवकांनी अॅड. अमरजीतसिंग गिरासे यांच्यामार्फत विभागीय आयूक्त व मनपा आयुक्तांच्या ऑनलाईन निवडणुकीच्या घोषणेला आव्हान दिले होते. या प्रकरणी न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि श्रीकांत कुलकर्णी यांच्या समोर सुनावणी झाली. न्यायालयाने निवड प्रक्रिया ऑनलाईन घेण्याचे आदेश दिले आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.