जळगाव (प्रतिनिधी) राज्यासह जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढू लागला आहे. मार्चच्या मध्यांतरातच जळगावचे तापमान ४० अंशावर पोहचले आहे. आजचे कमाल (Temperature) तापमान ३९ अंशाच्यावर नोंदविले गेले.
जळगाव शहरासह जिल्ह्यात सोमवारी ३८ अंश तापमान होते. तर आजच्या तापमानात १ अंशाने वाढ झाली असल्याने उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. यामुळे नागरिकांनी उन्हापासून बचावासाठी डोक्यावर टोपी, हातात रुमाल, महिलांनी स्कार्फ, सनकोटचा वापर सुरू केला आहे. बाजारपेठेत ग्रीननेट किंवा ताडपत्री टाकून उन्हापासून संरक्षण केले जात आहे. दुपारनंतर उन्हाच्या झळांनी नागरिक आतापासूनच हैराण होत असल्याचे दिसून येत आहे.
यंदा तापमानात वाढ
उत्तर भारतातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. मैदानी राज्यांमध्ये उष्णतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सोबतच सौराष्ट्र, कच्छमध्ये वाढलेले तापमान आणि उत्तर कोकणात जमिनीलगत वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे तापमानात वाढ होत आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यात तापमान वाढत आहे, अशी माहिती हवामान अभ्यासक नीलेश गोरे यांनी दिली. आपल्याकडे तापमान एप्रिल, मेमध्ये ४० अंशांवर जाते. यंदा प्रथमच ते मार्चमध्ये ४० ते ४४ अंश असेल.