जळगाव (प्रतिनिधी) संचालक मंडळाने बेकायदेशीररित्या दूध संघात प्रवेश करून बैठक घेतली होती. याबाबत रीतसर तक्रार करूनही त्यांच्याविरुद्ध कारवाई का नाही?, असा सवाल उपस्थित करत प्रशासक अरविंद देशमुख यांनी आज पोलिसांना निवेदन दिले आहे.
जिल्हा दूध संघातील संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलेले आहे. तसेच तेथे प्रशासक मंडळाने कारभार स्वीकारला आहे. परंतू २ ऑगस्ट रोजी मंदाताई खडसे यांच्यासह त्यांच्या संचालक मंडळातील ११ संचालकांनी दुध संघाच्या आवारात अनधिकृतरित्या प्रवेश करुन मिटींग हॉलमध्ये बैठक घेतल्याचा आरोप प्रशासक मंडळाने केला होता. याबाबत प्रशासक अरविंद देशमुख यांनी शहर पोलीस स्थानकात तक्रार देखील दिली होती. तसेच यापुढे संचालक मंडळाने बेकायदेशीररित्या प्रवेश केल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता अरविंद देशमुख यांनी तक्रारीव्दारे व्यक्त केली होती. एवढेच नव्हे तर, संबंधित संचालकांवर कारवाई करावी असेही तक्रारीत म्हटले होते.
शहर पोलीसात तक्रार देऊनही अद्याप गुन्हा दाखल न झाल्यामुळे अरविंद देशमुख यांनी शहर पोलिसांना आज निवेदन दिले. संबंधीतांविरुद्ध कारवाई करण्यासाठी विलंब का होत आहे ? अशी विचारणा या निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच संचालक मंडळ पुन्हा एकदा बैठक घेण्याची तयारी करत असून यातून कायदा व सुव्यवस्थेची काही अडचण निर्माण झाल्यास पोलीस प्रशासन जबाबदार राहणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, पोलीस प्रशासन आता नेमकी काय भूमिका घेते?, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
















