जळगाव (प्रतिनिधी) राज्याच्या बहुतांश भागात मागिल काही दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले असून अनेक भागात पूर परिस्थीती निर्माण झाली आहे. असे असतांनाही महावितरणने मान्सुनपुर्व केलेल्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांमुळे आणि नियोजनामुळे वीज वितरणात कुठलाही व्यत्यय आलेला नाही. भर पावसातही वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणचे प्रकाशदुत अहोरात्र कार्यरत आहेत.
वादळी वारे आणि मुसळधार पाऊस यामुळे वीज वितरण यंत्रणा कोलमडून पडण्याचा पुर्वेतिहास बघता महावितरणने यावर्षी विशेष नियोजनातून मान्सुनपुर्व देखभाल व दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणात राबविली होती. यासाठी महावितरणचे कर्मचारी आणि राज्यातील पाच हजाराहून अधिक एजन्सीजचे कर्मचाह्री अहोरात्र राबल्यानेच आतापर्यंतचा पाऊस राज्यातील नागरिकांसाठी सुसह्य ठरला आहे. मे आणि जून महिन्यात आवश्यक असलेल्या ठिकाणी व संबंधीत परिसरातील वीजपुरवठा खंडित राहणार असल्याची वीजबंदची पूवर्सूचना देऊन देखभाल व दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर राबविण्यात आली. पावसाळ्यात वीजयंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी तसेच वीजपुरवठा खंडित होण्याचे धोके टाळण्यासाठी महावितरणकडून प्रामुख्याने वीजवाहिन्यांना स्पर्श करणा-या झाडाच्या फांद्या तोडून टाकणे, तुटलेले पीन व डिस्क इन्सुलेटर बदलणे, वितरण रोहित्रांचे अर्थिंग तपासणे, ऑईल फिल्टरेशन, उपकेंद्रातील ब्रेकर्सची दुरुस्ती, बॅटरी चार्जींग, फ्यूज बदलणे, भूमिगत केबल टाकणे, खांब आणि तारांचे मजबुतीकरण, वीज खांब, तारा बदलणे किंवा झोल काढणे, जुन्या फिडर पिलरमध्ये इन्सूलेशन स्प्रे मारणे, तसेच पावसाचे पाणी साचणा-या परिसरातील फिडर पिलरची जमिनीपासून उंची वाढविणे आदी कामे करण्यात आली.
याचसोबत, रोहित्र आणि वीजयंत्रणेच्या ठिकाणी नागरिकांनी टाकलेला कचरा, वाढलेले गवत व झुडपांची देखील विल्हेवाट लावण्यात आली. खासगी किंवा संस्थांच्या मालकीच्या जागेतील झाडे किंवा मोठ्या लांबीच्या फांद्या वादळी व मुसळधार पावसामुळे वीजवाहिन्यांवर कोसळण्याची शक्यता असल्याने संभाव्य धोका निर्माण करणा-या झाडांची किंवा मोठ्या फांद्यांची संबंधितांनी महानगरपालिकेची परवानगी घेणा-या संबंधित जागा मालकाला महावितरणकडून सहकार्य करण्यात आले. पावसाळ्यात वीजतारांवर, खांबांवर झाडे पडून, पूरपरिस्थिती किंवा अतीवृष्टीमुळे खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी किंवा आवश्यक उपाययोजना करण्यासाठी सर्व विभागांतर्गत साधनसामुग्रीसह फिरते पथक देखील तयार ठेवण्यात आले असून आपात्कालीन कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. पूरपरिस्थिती अथवा वादळ आल्यास सुरक्षिततेच्या कारणास्तव त्या भागातील वीजपुरवठा महावितरणकडून खंडित करण्यात येवून परिस्थिती आटोक्यात येताच तत्परतेने तो पुर्ववत देखील केला जातो, अशा वेळी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. वीजग्राहकांसाठी टोल फ्री क्रमांक विजेसंबंधी काही समस्या उद्भवल्यास, अपघात वा दुर्घटना घडल्यास माहिती अथवा तक्रार नोंदविण्यासाठी 18001023435/ 18002333435/ 1912/19120 (राष्ट्रीय) या टोल फ्री क्रमांक चोवीस तास उपलब्ध आहेत. कोणत्याही कंपनीच्या लॅण्डलाईन किंवा मोबाईलद्वारे या टोल फ्री क्रमांकावर वीजग्राहकांना वीजसेवेविषयक तक्रार दाखल करण्याचे आवाहन देखील महावितरणने केले आहे.