जळगाव (प्रतिनिधी) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर खरेदीत कोट्यांवधीचा घोटाळा झाला होता. याप्रकरणी सामजिक कार्यकर्ते दिनेश भोळेंनी पोलिसांकडे ऑनलाईन तक्रार नोंदवल्यामुळे आता कायदेशीर प्रक्रियेला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे.
गैरफायदा घेतल्याचा आरोप
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर नसल्याने शेकडो नागरिकांचे बळी गेले होते. यामुळे राज्यात सरकारने व्हेंटिलेटर अभावी कोणाचा मृत्यू होऊ नये यासाठी व्हेंटिलेटर खरेदी करण्याचे अधिकार जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेला देण्यात आले होते. पण या अधिकारांचा गैरफायदा घेतल्याचा आरोप सामजिक कार्यकर्ते दिनेश भोळेंनी करत घोटाळा उघडकीस आणला होता.
नेमकं काय-काय खरेदी केलं होते आणि कसा झाला होता घोटाळा
नवजात बालकांसाठी १५ आणि प्रौढ व्यक्तींसाठी १५ असे एकूण ३० व्हेंटिलेटर खरेदी करण्यात आले होते. मात्र खरेदी करण्यात आलेल्या व्हेंटिलेटरची कंपनी आणि किंमतीमध्ये घोळ झाल्याचं माहिती अधिकारातून उघड झाले होते. या खरेदीमध्ये जेईएम पोर्टलवर मॅक्स प्रोटॉन प्लस कंपनीच्या व्हेंटिलेटरची किंमत १२ लाख ३८ हजार ४३१ रुपये दाखवण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात व्हेंटिलेटरचे बाजार मूल्य ५ लाख ७७ हजार ५०० एवढे आहे. नवजात शिशू आणि मोठ्या व्यक्तींसाठी ३० व्हेंटिलेटर घेण्यात आली. त्यापोटी ३ कोटी ७१ लाख ५४ हजार १३० रुपये एवढा निधी जिल्हा सामान्य रुग्णालयाला मिळाला. पण नामांकित ब्रँण्डऐवजी दुसऱ्याच कंपनीची मशीन्स (असेम्बल) मागवण्यात आल्याचे उघड झाले होते. विशेष म्हणजे २९ मे रोजी या संदर्भातली निविदा मंजूर झाली आणि २८ जूनपर्यंत व्हेंटिलेटर ताब्यात घेऊन त्यांचा वापर सुरू होणं अपेक्षित होतं. मात्र तसे काहीच झाले नाही, असा आरोप सामजिक कार्यकर्ते दिनेश भोळेंनी यांनी केला होता. दरम्यान, याप्रकरणी दिनेश भोळेंनी आज पोलिसांच्या सीसीटीएनएसला ऑनलाईन तक्रार नोंदवली आहे. तसेच याची एक प्रत पोलीस अधीक्षक कार्यालय आणि जिल्हा पेठ पोलीस स्थानकात दिली आहे.