जळगाव (प्रतिनिधी) शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अधिकचा नफा मिळवून देतो, असे अमिष दाखवीत रेल्वेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला ऑनलाईन ठगांनी ५३ लाख ६५ हजारात गंडविले. ही घटना बुधवारी उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात ऑनलाईन ठगांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात वास्तव्यास असलेले रेल्वेचे निवृत्त कर्मचारी यांना दि. १० जून रोजी रात्री एक कॉल आला. समोरुन बोलणाऱ्या व्यक्तींनी त्यांची नावे ही अमीत मालवीय, आदित्य जैन, विजय कुमार असे सांगितली. त्या तिघांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला तुम्ही आमच्या रेझ पिरॅमीड एलिट प्रकल्प योजनेत अर्थात शेअर मार्केटमध्ये ऑनलाइन गुंतवणूक करा. यामध्ये गुंतवणुक केल्यास आम्ही तुम्हाला जास्तीचा नफा मिळवून देवू असे त्यांनी सांगितले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने दि. १० जून ते दि. ३१ जुलै पर्यंतच्या कालावधीत केरळ, दिल्ली, बंगळुरु, गुवाहाटी या राज्यातील १२ बँक खात्यात ५३ लाख ६५ हजार रुपये जमा केले. त्यातून त्यांना ८३ लाख रुपये नफा झाल्याचे दाखविण्यात आले. नफा झालेली रक्कम काढण्यासाठी सेवानिवृत्त कर्मचारी हे गेले असता, त्यांना जीएसटीचे ५ टक्के, आयकराचे दहा टक्के रक्कम भरावी लागेल असे त्यांना सांगण्यात आले होते.
सायबर पोलिसात धाव घेत सांगितला घटनाक्रम
गुंतवणुकीवर झालेल्या नफ्याची रक्कम बँकेतून काढता येत नव्हती. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला त्याविषयी संशय आला. त्यांनी लागलीच सायबर पोलीस ठाणे गाठून संपूर्ण घटनाक्रम सांगितला. पोलिसांनी केलेल्या चौकशीत ही नफ्याची रक्कम डिजिटल अॅप्लीकेशनवर दिसत होती. प्रत्यक्ष बँक खात्यात जमा झालेलीच नव्हती. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची फसवणुक झाल्याचे उघड झाले.
टेलीग्रामसह व्हॉट्सअॅपवर साधत होते संपर्क
फसवणुक करणारे सायबर गुन्हेगार हे व्हाटसअॅप, टेलिग्रामवरच्या नऊ नंबरवरुन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यासोबत बोलत होते. सायबर पोलिसांनी ते सर्व क्रमांकाची तपासणी केली असता, ते सर्व क्रमांक फेक असल्याचे त्यांच्या तपासात उघड झाले. दरम्यान, संबंधित कर्मचारी हे नाशिक येथे रेल्वेत नोकरीला होते. सेवानिवृत्तीची रक्कम त्यांनी बँकेत ठेवली होती. मात्र सायबर चोरट्यांनी त्यांच्या रकमेवर डल्ला मारला.