TheClearNews.Com
Wednesday, July 30, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव सेक्स स्कॅन्डल : एक काळाकुट्ट इतिहास !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 4, 2023
in गुन्हे, जळगाव, विशेष लेख
1
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जेव्हा एखादं विस्तारू पाहत असलेल्या एका छोट्या शहरात ‘सेक्स स्कॅन्डल’ सारखा भयानक शब्द समोर येतो. त्यावेळी अवघं जग हादरते. तसचं काहीसं आपल्या जळगावच्या बाबतीत देखील एकेकाळी घडलं होतं. ‘जळगाव सेक्स स्कॅन्डल’मुळे अवघ्या जगात जळगावची बदनामी झाली होती. वेगवेगळ्या लैंगिक शोषणाच्या घटनांमधून त्याकाळात तीन खून झाले होते. आपली तक्रार घेऊन हायकोर्टात गेलेल्या एका महिलेला जिवंत जाळण्यात आले होते.  भुसावळमध्ये 90 च्या दशकात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज विक्री होत होती. याविषयी तत्कालीन आमदार एकनाथराव खडसे यांनी विधानसभेत आवाज उठविल्यानंतर साधारण ६० ते ७० लाखाचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. त्यानंतर याप्रकरणात मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील एका आरोपीला पकडण्यात आले. त्या आरोपीने जळगावमधील एका नगरसेवकाच्या भावाचे नाव सांगितले. त्यातून ‘जळगाव सेक्स स्कॅन्डल’चे प्रकरण उघडकीस आले आणि देशभरात प्रचंड खळबळ उडाली. या रिपोर्टमधून जाणून घ्या ‘जळगाव सेक्स स्कॅन्डल’चा संपूर्ण काळाकुट्ट इतिहास !

 

READ ALSO

शानबाग विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतला ‘गाईड’ एकांकिकेचा भावस्पर्शी अनुभव

केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या हस्ते राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन..!

पुणे सीआयडीकडून मिळालेल्या माहिती नुसार ‘जळगाव सेक्स स्कॅन्डल’शी संबंधित वेगवेगळे तब्बल २० गुन्हे दाखल होते. सेक्स स्कॅन्डलचा गोंधळ सुरु असतांना तत्कालीन नगरविकास मंत्री अशोक चव्हाण यांनी २६ जुलै १९९४ रोजी बेकायदेशीर बांधकामांच्या तक्रारीवरून जळगाव नगरपालिका बरखास्त केली होती. जळगावचा हा असा काळा इतिहास आहे, ज्याची आठवण करायला आजही कुणाला आवडत नाही. परंतु आपल्या सुरक्षित भावितव्याठी हा काळाकुट्ट इतिहास आपल्याला समजून घ्यावाच लागणार आहे.

 

जळगाव हे शहर ९० च्या दशकात त्यावेळी महाराष्ट्रात सर्वात वेगाने वाढणारे आणि प्रगतीपथावर असलेले शहर होते. त्यावेळी जळगाव शहरात १५० पेक्षा अधिक युनिट एमआयडीसीमध्ये कार्यरत होते. त्यात जवळपास १२ मोठ्या प्रकल्पांचा समावेश होता. जैन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या 200 कोटींच्या प्रकल्पाशिवाय जळगावने मोठय़ा कॉर्पोरेट घराण्यांना आकर्षित करायला सुरुवात केली होती. व्हीआयपी, रेमंड्स, मॅरिको आणि सुप्रीम इंडस्ट्रीज सारख्या मोठ्या कंपन्यांनी येथे आपला जम बसवायला लागले होते. परंतु ‘जळगाव सेक्स स्कॅन्डल उघड’ झाल्यानंतर मात्र सामाजिक,राजकीयसह उद्योग जगतातही मोठी खळबळ उडाली होती.

 

राजकीय आणि आर्थिक ताकदीचा माज असलेले विकृत ज्याठिकाणी एकत्र येतात. तेथे अनैतिक गोष्टी घडणारच. परंतु ज्या जिल्ह्याला बहिणाबाई,साने गुरुजी, बालकवी आणि संत चांगदेव सारख्या महान व्यक्तींचा इतिहास आहे. त्याच जिल्ह्यात अश्लील फोटो,कॅसेटच्या माध्यमातून गरीब, निष्पाप मुली आणि महिला कुस्करल्या जाणे, ही एकदम भयंकर बाब होती. ब्लॅकमेलींग करून जबरदस्तीने लैंगिक शोषण ही आताच्या काळात काही नवीन बाब नाही, परंतु १९९४ साली जेव्हा जळगावात ‘सेक्स स्कॅन्डल’ उघड झाले. त्यावेळी अवघ्या जिल्ह्यासह देशभरात भूकंप झाला होता. सर्वसामान्य जळगावकरांवर तर हा मोठा आघात होता.

 

‘सेक्स स्कॅन्डल’ तपासाचा वेग जसं-जसा वाढू लागला,तसं साधारण ३२ जणांना अटक झाली. या स्कॅन्डलमध्ये तीन वेगवेगळ्या पद्धतींचा समावेश होता. तसेच जळगाव व भुसावळ येथील दोन मोठ्या घटना प्राथमिक तपासात समोर आल्या होत्या. त्यात भुसावळची घटना आधी घडलेली होती. तपासात कालांतराने पीडितांची संख्या आणि गुन्ह्यांची व्याप्ती वाढली. या स्कॅन्डलमध्ये तब्बल ३०० ते ५०० पिडीत महिला, मुलींचे शोषण झाल्याची चर्चा त्यावेळी समोर आली होती.

 

पिडीत मुलींमध्ये अनेक अल्पवयीन शाळकरी मुली तसेच काही सुशिक्षित घरातील महिलांचा समावेश असल्याचेही बोलले जात होते. या प्रकरणात जळगावचा एक विद्यमान नगरसेवक, दोन डॉक्टर आणि एका नेत्याच्या मुलाला अटक झाली होती. दुसरीकडे भुसावळ मधून एका राजकीय पक्षाच्या जिल्हाध्यक्ष असलेल्या वकीलाला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात सुरुवातीच्या काळात समोर आलेली सर्वच संशयितांची नावे वलयांकित असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी याच विषयावर अनेक जण स्फोटक चर्चा करतांना दिसून यायचे.

 

भुसावळमधील राजकीय पक्षाचा जिल्हाध्यक्ष असलेल्या वकीलावर भुसावळ मधीलच डॉक्टरच्या रुग्णालयातील एका नर्सने बलात्काराचा आरोप केला होता. २ जुलैला याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पिडीत महिलेच्या म्हणण्यानुसार एका कामात मदत मागण्यासाठी ज्यावेळी, मी संबंधित जिल्हाध्यक्ष असलेल्या वकीलाकडे गेली होती. त्यावेळी त्याने माझ्यावर बलात्कार केला. तसेच काही अश्लील फोटो काढून मला वेळोवेळी ब्लॅकमेलींग केले गेले. माझ्या सोबत जे झाले, ते इतरांसोबत होऊ नये, म्हणून मी गुन्हा दाखल केला असल्याचे देखील पिडीत महिलेने म्हटले होते.

 

‘जळगाव सेक्स स्कॅन्डल’च्या आसपासच्या गुप्ततेचे रहस्य मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील शाहनवाज नामक आरोपीच्या अटकेनंतर उघड झाले होते. शाहनवाजला भुसावळमधून अटक झाल्यानंतर त्याने पोलिसांच्या चौकशीत जळगावमधील एका बड्या नेत्याच्या भावाचे नाव सांगितले होते. या प्रकरणात त्यालाच पहिली अटक झाली होती. त्यानंतर जळगावमधील मुख्यत्वे दोन स्थानिक टोळ्यांचे आणि त्यांच्या प्रमुख म्होरक्यांना देखील अटक करण्यात आली होती. यातील एक आरोपी बरेच दिवस फरार होता. त्यानंतर त्याला गुजरातमधील एका रेल्वेस्थानकावरून अटक करण्यात आली होती.

 

भुसावळमधील एका वैद्यकीय अधिकारीने २५ जून रोजी पिडीतेच्या वतीने सामुहिक बलात्काराची तक्रार नोंदवली. त्यात एका डॉक्टरसह तीन जण आरोपी होते. या तक्रारीनुसार पिडीत महिलेला साकेगाव शिवारातील एका मळ्यात जबरदस्ती नेत बलात्कार करण्यात आला होता. तर जळगावात अन्य २ तक्रारी दाखल झालेल्या होत्या. त्यात एका नगरसेवकाचा व एका माजी आमदाराच्या मुलाचा समावेश होता. जळगावच्या गुन्ह्यातील पिडीत ही अल्पवयीन होती. या अल्पवयीन पिडीत मुलीने आपल्या तक्रारीत म्हटले होते की, आरोपी नगरसेवकाने मागील तीन वर्षात तिच्यावर तीन वेळेस बलात्कार केला. तसेच अखेरचा बलात्कार हा मागील पाच महिन्यापूर्वी झालेला आहे. या गुन्ह्यात आरोपींवर आरोप होता की, त्यांनी पिडीत मुलींचे लैंगिक शोषण केले. तसेच त्यांचे अश्लील फोटो काढून त्यांना ‘सेक्स स्कॅन्डल’मध्ये ब्लॅकमेलींग केले. यातील आरोपी नगरसेवक पळून गेल्यानंतर जळालेल्या कॅसेट, फोटो, स्प्रे तसेच काही औषधी पोलिसांना सापडल्या होत्या.

 

या सापडलेल्या औषधींचे कंटेंट जाणून घेण्यासाठी पोलिसांनी एका डॉक्टरला पाचारण केले होते. डॉक्टरने औषधी बघितल्यानंतर सांगितले की, या औषधी वेदनाशामक तसेच बेशुद्ध करण्यासाठी वापरल्या जातात. यावरून पोलिसांनी संपूर्ण सेक्स स्कॅन्डलचे नेटवर्क कसे काम करायचे याचा अंदाज बांधला होता. यात मुलींना विविध मदतींचे आश्वासन देऊन, कशा पद्धतीने फसविले जाते,हे देखील पोलिसांच्या लक्षात आले होते. मदतीच्या नावाखाली मुलींना बोलवायचे आणि गुंगीचे औषध देऊन त्यांच्यासोबत बलात्कार करायचा. बलात्कार करीत असतांना फोटो काढायचे व शुटींग देखील करायची. नंतर हेच फोटो आणि कॅसेटला सार्वजनिक करण्याचा धाक दाखवून मुलींना ब्लॅकमेलींग केले जायचे.

 

या सर्व गोष्टी शहरातील एका अपार्टमेंट व तिरुपती नामक हॉटेलमध्ये सुरु होत्या. ही हॉटेल आधीच एक टोळी वापरत होती. पोलिसांनी नंतर ही हॉटेल सील केली. खास करून तो रूम, ज्यामध्ये हा सर्व प्रकार चालायचा. तिरुपती हॉटेलमधील रूम नंबर २०६ मध्ये खास सुविधा करण्यात आल्या होत्या. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांच्या मदतीने तेथे फोटो व शुटींगचे कॅमेरे नेता येत होते. म्हणूनच नंतर या हॉटेलच्या मालक व भागीदाराला देखील अटक करण्यात आली होती.

 

याठिकाणी तयार करण्यात आलेल्या फोटो आणि कॅसेटमध्ये सर्वसामान्य मुली होत्या. त्यामध्ये खास करून अल्पवयीन मुलींचा समावेश असल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. या अश्लील कॅसेट जळगाव जिल्ह्याच्या जवळील परिसरात तसेच महाराष्ट्रभर विकल्या गेल्या होत्या. त्यामुळे महाराष्ट्रभर जळगावची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली होती. जळगावमधील काही सुज्ञ नागरिकांनी त्यावेळी या स्कॅन्डलमधील पीडितांना न्याय मिळावा म्हणून ‘अत्याचार विरोधी कृती समिती’ची स्थापना केली होती. त्यावेळी कृती समिती कॅसेट तयार झाल्या असल्याचे म्हणत होती. पोलीस मात्र, या गोष्टी स्पष्टपणे नाकारत होती. एवढेच नव्हे तर, तत्कालीन पोलीस अधीक्षक पी.डी.जाधव यांनी अशा कॅसेट आमच्या तपासात कधीच समोर आल्या नसल्याचे सांगितले होते. दरम्यान, पोलिसांनी जप्त केलेली एकमेव कॅसेटही इंग्रजी भाषेतील पोर्नोग्राफिक होती. तर इतर कॅसेट या जळालेल्या अवस्थेत होत्या.

 

पोलीस पुराव्यामध्ये ३२ अश्लील छायाचित्रे असल्याचे समोर आल्याचे देखील म्हटले गेले होते. त्या छायाचित्रांमध्ये फक्त दोन मुली होत्या आणि त्या दोघंही जळगावबाहेरच्या असल्याचे सांगण्यात आले होते. अटक केलेल्यांच्या जबाबानुसार एकूण ४७ पीडीत महिलांचे नावे समोर आली होती. परंतु यातील बहुतांश महिलांनी या स्कॅन्डलमध्ये अडकल्याचा इन्कार केला होता. दोन महिलांनी तर एकमेकींवर याप्रकरणात ‘तूच मुद्दाम गोवले’, असा एकमेकीवर आरोप केला होता. दरम्यान, काही दिवसांनी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी याप्रकरणात ४९ पिडीतांची नावे,सामोर आल्याचे सभागृहात सांगितले होते. तसेच आ. एकनाथराव खडसे यांनी सभागृहात दिलेली कॅसेट बघितल्यावर काही नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली होती.

 

जळगावमधील दैनिकांनी या स्कॅन्डलमध्ये साधारण ५०० पेक्षा अधिक महिलांचे शोषण झाल्याचे त्यावेळी म्हटले होते. शहरातीलच एका मोठ्या उद्योजकाच्या तीन बँक लॉकर आणि एका घरातून साधारण १८९ फोटो प्रिंट आणि निगेटिव्ह पोलिसांनी जप्त केल्यानंतर तर चांगलीच चर्चा रंगली होती. परंतु’सेक्स स्कॅन्डल’शी निगडीत हे पुरावे पुरेसे नव्हते. तसेच या स्कॅन्डलमध्ये गुंतलेल्या अनेक बड्या लोकांची नावे पोलीस लपवित असल्याचा आरोपही त्यावेळी मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता. एवढेच नव्हे तर, एका मोठ्या पोलीस अधिकाऱ्यावर १ कोटीची लाच घेतल्याचा देखील आरोप करण्यात आला होता. या मुद्द्यावरून विधानसभेत चांगलाच गदारोळ झाला होता.

 

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर आणि अरविंद इनामदार यांची चौकशी समिती नेमली होती. हे दोघे महिनाभर जळगावला तळ देऊन होते. परंतू काही दिवसांनंतर या गुन्ह्यांचा तपास मंदावला. कारण कोणतीही महिला किंवा मुलगी पुढे येऊन तक्रार देण्यास धजावत नव्हती. परंतु तत्कालीन नाशिक विभागीय आयुक्त लीना मेहेंदळे, महिला व बाल कल्याण विभाग सचिव चंद्र अय्यंगार आणि पुणे सीआयडी विभागच्या पोलीस अधीक्षक मीरा बोरवणकर या तीन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आल्यानंतर अनेक पिडीत मुली आपबिती सांगण्यास समोर आल्या होत्या. दरम्यान, एका अन्य लैंगिक शोषण प्रकरणात एका पिडीत महिलेने अखेरच्या श्वासापर्यंत आरोपींना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार केला होता. याबाबत ती न्यायालयात देखील गेली होती. परंतु नंतर तिला जिवंत जाळून मारण्यात आले होते.

 

या पिडीत मुलींच्या तक्रारींनुसार परीक्षेत पास करून देण्यासाठी, नौकरी मिळवून देण्यासाठी तसेच विविध प्रलोभन दाखवून त्यांना या स्कॅन्डलमध्ये अडकवण्यात आले होते. यातील बहुतांश मुली जळगाव शहराबाहेरील होत्या. या पिडीत मुली शैक्षणिक कामानिमित्त तथा नौकरीच्या शोधासाठी जळगाव शहरात आलेल्या होत्या. यातील अनेक मुली भाडेकरू म्हणून रूम करून किंवा वसतिगृहात राहत होत्या. परिवारापासून लांब राहत असल्यामुळे या मुली इतर मुलींच्या तुलनेत स्फाॅट टार्गेट ठरल्यात.

 

जळगावात आलेल्या या मुलींमधील कर्जबाजारी किंवा आर्थिक अडचणीत असलेल्यांना गोड बोलून घरी किंवा हॉटेलमध्ये नेण्यात यायचे. त्यानंतर शीतपेयातून त्यांना गुंगीचे औषध दिले ज्यायचे. एकदा मुली बेशुद्ध झाल्यात की, त्यांच्या सोबत अश्लील फोटो काढायचे व व्हिडीओ शुटींग करायची. याच फोटो व शुटींगच्या जोरावर त्यांचे वारंवार लैंगिक शोषण करायचे, अशी या सेक्स स्कॅन्डलची मोडस ऑपरेंडी होती.

 

विधानसभेत जोरदार चर्चा

‘जळगाव सेक्स स्कॅन्डल’संदर्भात महाराष्ट्राच्या विधानसभेत चांगलीच वादळी चर्चा झाली होती. या चर्चेत साधारण सर्वच पक्षाच्या सदस्यांनी सरकारला धारेवर धरले होते. त्यावेळी आर.आर.पाटील,सुभाष कुल,अनिल बाबर,प्रकाश देवसकर, गणेश नाईक, बबन घोलप, दत्ता नलावडे, नरसिंगराव पाटील, नारायण राणे, देवराम गेडाम, वामनराव कासावार, प्रतापसिंग आडे,प्रदीप वडनेरे,गोपीनाथ मुंडे, एकनाथराव खडसे, शोभाताई फडणवीस, अरुणभाऊ अडसड,जगन्नाथ पाटील,विष्णू सावरा,हशू अडवाणी,प्रकाश मेहता,दत्ता राणे, राज पिरोहित,गोविंदराव चौधरी,ईश्वर जाधव, दलवीरसिंग पाडवी,गणपतराव काठे,शशिकांत सुतार,अनिल राठोड,मधुकर सरपोतदार,प्रकाश वालगुलवार,लक्ष्मण ढोबळे,जयंत पाटील,तुकाराम दिघोळे,सालोजीराव मोगल,नंदकुमार झावरे, भानुदास मुरकटे,अनिल वऱ्हाडे,गजानन दाळू,ल.शि.कोम,निहाल अहमद,गुलाबराव पाटील,परशुराम टावरे,संभाजी पवार,दादा जाधवराव,पुष्पसेन सावंत, शरद पाटील,श्रीपादराव शिंदे,सरोज काशीकर,वामनराव चटप आणि गणपतराव देशमुख यांनी आपत्कालीन चर्चेत सहभाग घेतला होता. यातील सर्वच लोकांनी तत्कालीन सरकारला चांगलेच धारेवर धरले होते.

 

या चर्चेत सर्वातजास्त खळबळजनक माहिती व आरोप गोपीनाथ मुंडे आणि एकनाथराव खडसे या दोघांनी केले होते. खडसे यांनी सभागृहातील आपल्या भाषणात त्यावेळी म्हटले होते की, त्यांच्या एका परिचयातील व्यक्तीच्या मुलीला ब्लॅकमेलींग करण्यात आले. पोलिसांनी दखल न घेतल्यामुळे ती हायकोर्टांत गेली. परंतु आरोपींनी तिला नंतर जिवंत जाळून मारले. तर पोलिसांनीच दखल न घेतल्यामुळे एका अन्य मुलीने आत्महत्या केल्याचेही सांगितले होते. तसेच पिडीत मुलींच्या पालकांना दिवसाढवळ्या चाकू-सुरे लावून धमकाविले जात होते. त्यामुळे ‘सेक्स स्कॅन्डल’बाबत तक्रार देण्यासाठी मुली समोर येत नव्हत्या.

 

जळगावातील वेगवेगळ्या लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये तीन खून झाल्याचे देखील सभागृहात खडसे यांनी सांगितले होते. एवढेच नव्हे तर, सभागृह अध्यक्षांना वासनाकांडची कॅसेट देखील दिली होती. भुसावळमध्ये ड्रग्ज विकले जाते. यावर आपल्या तक्रारीवरून कारवाई झाली आणि त्यातून जळगाव सेक्स स्कॅन्डल उघडकीस आले. त्यामुळे जे मुंबई स्फोटातील आरोपी आहेत,तेच सेक्स स्कॅन्डलमधील आरोपी असल्याचा आरोप देखील एकनाथराव खडसे यांनी केला होता.

 

तर तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी या प्रकरणातील सर्व ३२ आरोपींची नावे सभागृहाला सांगितली होती. तसेच आरोपींनी धाक दाखवून, आमिष देऊन, असहायतेचा फायदा घेऊन अत्याचार केल्याचे सांगितले होते. तसेच ३२ छायचित्र, २५ निगेटिव्ह जप्त केल्याचे सांगितले होते. हॉटेल तिरुपतीमधून परदेशी बनावटीच्या अश्लील कॅसेट मिळाल्याची माहिती देखील सभागृहाला दिली होती. त्याचप्रकारे हॉटेल मालकाला अटक करून हॉटेलचे लायसन्स रद्द केल्याचे देखील सांगितले होते.

 

आमदार प्रकाश जावडेकर यांनी देखील चर्चेच्यावेळी सभागृहात सांगितले होते की,ते स्वत: जळगावला जाऊन आले होते. त्यावेळी एका महाविद्यालयातील मुलीला उचलून थेट होस्टेलमध्ये आणण्यात आले आणि त्यावेळी तीच्यावर बलात्काराचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणात सर्व पुढाऱ्यांची मुले गुंतलेली होती. विरोध करणाऱ्या रेक्टरला मारहाण देखील करण्यात आल्याचे त्यांनी सभागृहाला सांगितले होते. अशा प्रकराची गंभीर घटना ‘सेक्स स्कॅन्डल’ उघडकीस येण्याआधी घडली होती. पोलिसांनी वेळीच अशा प्रकरणांमध्ये लक्ष घातले असते, तर अशा विकृतीला आळा बसला असता.

 

‘जळगाव सेक्स स्कॅन्डल’ प्रकरणातील बहुतांश आरोपी निर्दोष सुटले आहेत. काही जण जिल्हा न्यायालय तर काहींना उच्च न्यायालातून दिलासा मिळाला आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील प्रमुख तपासधिकाऱ्यांनी आरोपींच्या निर्दोष सुटण्याची वेगवेगळी कारणे सांगितली होती. तूर्त ‘सेक्स स्कॅन्डल’ किती खरं किती खोटं, या भानगडीत न पडता. या काळाकुट्ट इतिहासाची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी घेणे एवढेच जळगावकरांच्या हातात आहे.

विजय वाघमारे (9284058683)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

शानबाग विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतला ‘गाईड’ एकांकिकेचा भावस्पर्शी अनुभव

July 30, 2025
क्रीडा

केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या हस्ते राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन..!

July 30, 2025
जळगाव

मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजनेमुळे शेतीला दिवसा वीजपुरवठा व उद्योगांच्या दरात घट : सीएमडी श्री. लोकेश चंद्र यांची माहिती

July 30, 2025
गुन्हे

बारा वर्षीय मुलीसह तिच्या आईचा तरुणाने केला विनयभंग

July 30, 2025
धरणगाव

धरणी नाल्याला संरक्षण कठळे लावण्याची मागणी तीव्र

July 30, 2025
जळगाव

जळगाव जिल्ह्यात होणार 850 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प; मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला गती द्या

July 29, 2025
Next Post

चोपडा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा ; भाजपचे तहसीलदारांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बांभोरी येथून अवैध वाळू उपसा ; तिघांवर धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल !

December 8, 2024

विद्यापीठ व एसीटीचा विद्यार्थी हितासाठी आदर्श उपक्रम : डॉ.बाळू पी.कापडणीस

July 19, 2021

कासोदा येथील पद्मावती जिनिंगच्या गोडावूनला भीषण आग

February 3, 2021

महावितरणचा महादिलासा : उच्चांकी मागणीएवढा अखंडित वीजपुरवठा

April 28, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group