जळगाव (प्रतिनिधी) जुन्या वादातून टोळक्याने एकाच्या घरावर हल्ला करीत तोडफोड केल्याची घटना तुकारामवाडी परिसरात घडली होती. त्यानंतर टोळके तेथून पसार झाले होते, पोलिसांकडून त्याचा शोध सुरु असल्याने एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने वाघ नगरातून टोळक्याच्या मुसक्या आवळल्या.
शहरातील तुकाराम वाडी परिसरातील अरुण गोसावी व सुरेश ओतारी यांना काही तरुणांनी मारहाण केली होती. यामध्ये सुरेश ओतारी याचा मृत्यू झाल्याने पाच जणांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पाच संशयितांना अटक करण्यात आली होती. त्याच कारणावरुन दि.६ एप्रिल रोजी रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास अरुण गोसावी यांच्या घरावर भुषण माळी उर्फ भाचा, आकाश ठाकूर उर्फ खंड्या, पवन बाविस्कर उर्फ बद्या, सचिन चौधरी उर्फ टिचकुल्या, आकाश मराठे उर्फ ब्रो, चेतन सुशिर उर्फ बटाट्या यांनी गोसावी यांच्या घरावर हल्ला केला. सर्वांनी घरावर दगडफेक करीत लाठ्याकाठ्यांनी सामानाची तोडफोड करीत नुकसान केले होते. त्यावेळी गोसावी यांनी घराच्या मागच्या दरवाजातून पळून जात आपला जीव वाचविला होता. त्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या पथकाची कारवाई
ही कारवाई पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे, पोउनि दीपक जगदाळे, दत्तात्रय पोटे, सफी अतुल वंजारी, किशोर पाटील, चंद्रकांत पाटील, सचिन पाटील, ललित नारखेडे, छगन तायडे, किरण पाटील, नितीन ठाकूर, गणेश ठाकरे, संजीव मोरे, साईनाथ मुंढे यांच्या पथकाने केली.
वाद उफळून येण्यापूर्वीच केली अटक
टोळक्याने केलेला हल्ला हा जून्या वादातून झाल्यामुळे त्यांच्यातील वाद पुन्हा उफळून येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षकांनी संशयितांना अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. हे संशयित वाघनगरात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाल्याने त्यांनी गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या होत्या.
मारहाण करणारे टोळके गजाआड
पथकाने वाघ नगरातून संशयित भूषण उर्फ भासा विजय माळी, आकाश उर्फ सुकलाल खंड्या ठाकूर, पवन उर्फ बद्या दिलीप बाविस्कर, सचिन उर्फ टिचकुल्या कैलास चौधरी (सर्व रा. तुकारामवाडी), आकाश उर्फ ब्रो रविंद्र मराठे, चेतन उर्फ बटाट्या रमेश सुशिर (सर्व रा. पिंप्राळा) यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांना न्यायालयाने एक दिवासांची पोलीस कोठडी सुनावली