जळगाव (प्रतिनिधी) शहरातील आहुजा नगर परिसरातील शिवधाम मंदिरासमोरील ब्रम्हांडनायक अपार्टमेंटमध्ये पतीने पत्नीला मोबाईल चार्जरच्या वायरने गळफास देऊन तिचा खून केल्याची खळबळजनक घटना आज शनिवारी सायंकाळी साडे सहानंतर उघडकीस आली. कविता जितेंद्र पाटील (वय २०) असे मयत विवाहितेचे नाव आहे. तर पत्नीला गळफास दिल्यानंतर पती स्वतःच तालुका पोलीस ठाण्यात हजर झाला. जितेंद्र संजय पाटील (वय २५) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
मोबाईल चार्जरच्या वायरच्या साह्याने दिला गळफास
आहुजा नगर परिसरातील शिवधाम मंदिर जवळ ब्रह्मांडनायक अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये पाटील दाम्पत्य वास्तव्यास आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी हे दांपत्य बांभोरी येथून जळगावात राहायला आले होते. शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता पती जितेंद्र याने त्याची पत्नी कविता हिला मोबाईल चार्जरच्या वायरच्या साह्याने गळफास दिला. गळफास दिल्यावर पत्नीचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यावर पती हा स्वतःच तालुका पोलीस ठाण्यात हजर झाला. त्यानेच पोलिसांना मी पत्नीला गळफास देत तिचा खून केल्याची माहिती दिली. त्यानुसार तालुका पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले व मृत्यूच्या तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवला. संशयित आरोपीला दीड वर्षांची मुलगी आहे. घटनेची माहिती पसरताच अपार्टमेंट जवळ एकच गर्दी झाली होती.
अनैतिक संबंधाच्या संशय आणि लव्ह स्टोरीचा भयानक शेवट !
संशयित आरोपी जितेंद्र याने पोलिसांनी माहिती दिली की, तो मूळ धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील रहिवासी आहे. त्याचं आणि कवितांचा दोन ते तीन वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला आहे. लग्नानंतर पत्नीचे एका तरुणासोबत अनैतिक संबध जुळले होते. पत्नीला अनेकवेळेस समजावले. परंतू ती ऐकत नव्हती. मी गाव सोडून जळगावात आलो. परंतू तरी तो तरुण तिच्या संपर्कात होता. काही दिवसापूर्वी जळगावातील घरी देखील तो आला होता. पत्नीला समजावले. परंतू ती उलट मलाच आत्महत्या करण्याची धमकी देत होती. आजही तिला बोललो. पण पत्नी तशीच आत्महत्येची धमकी देत होती. त्यामुळे कंटाळून मी तिला गळफास दिल्याचे संशयित जितेंद्रने पोलिसांना सांगितल्याचे कळते. विशेष म्हणजे जितेंद्र आणि कविता प्रेम विवाह होता. या लव्ह स्टोरीचा भयानक शेवट झाल्यामुळे समाजमन सुन्न झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा, पोलीस निरीक्षक श्री. कुंभार यांनीही घटनास्थळी भेट माहिती जाणून घेतली.